घरमहाराष्ट्रविजयात अडथळा ठरणार्‍यांना पक्षातच प्रवेश

विजयात अडथळा ठरणार्‍यांना पक्षातच प्रवेश

Subscribe

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी आपले उमेदवार जास्त संख्येने निवडून यावेत,यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेने आपल्या उमेदवारांच्या मतदार संघातील मित्रपक्षातील नाराजांची समजूत काढणार्‍या तसेच डोकेदुखी ठरणार्‍या विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आता सचिन अहिर, संजय दिना पाटील,सतीश सावंत यांच्यापाठोपाठ आता भायखळ्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. जामसुतकर हे काँग्रेसमध्ये राहिल्यास शिवसेनेच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच जामसुतकर यांना शिवसेनेत घेतले जात असल्याची माहिती मिळत आहे.

वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेते व युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांचे प्रमुख आव्हान राहणार होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी, सचिन अहिर यांना शिवसेनेत घेवून आपल्या विजयातील प्रमुख अडथळा दूर केला. त्यानंतर भांडुप मतदार संघातून अशोक पाटील यांचा पत्ता कापून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु अंतर्गत नाराजीचा फटका कोरगावकर यांना बसू नये म्हणून सुरक्षिततेचा भाग म्हणून ईशान्य मुंबईतील राष्ट्वादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. संजय पाटील यांच्या प्रवेशामुळे भांडुपचा विजय अधिकच सुकर झालेला आहे.

- Advertisement -

कोकणातही विरोधकांना फोडले

कोकणातील कणकवली विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून अरुण दुधवडकर यांचे नाव चर्चेत होते. दुधवडकर हेच संभाव्य उमेदवार म्हणून मानले जात होते. परंतु आमदार नितेश राणे यांच्यासमोर निवडणूक लढवण्यास असमर्थ असल्याने, तसेच नितेश राणे यांच्यासमोर निभाव लागणार नसल्याने शिवसेनेने स्वाभिमान संघटनेचे सतीश सावंत यांना फोडून शिवसेनेत प्रवेश दिला. त्यानंतर दुधवडकर यांच्याऐवजी सतीश सावंत यांना नितेश राणे यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरवले गेले.

मोडक आणि वाळुंजची काढली समजूत

जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांचे आणि भाजपच्या नगरसेविका उज्वला मोडक यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. युती असली तरी मागील अनेक निवडणुका हे दोघेही एकत्र आलेले नाहीत. त्यामुळेच यंदा वायकर यांना धडा शिकवायचाच या निर्धाराने मोडक मैदानात उतरण्याच्या तयारीत होत्या.परंतु, युती झाल्याने हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तरीही वायकर यांना धडा शिकवण्यासाठी बंडखोरी करण्याच्या तयारीत असताना केवळ पक्षश्रेष्ठींच्या सुचनेनुसार त्यांनी माघार घेतला. ही नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश आले असून वायकर आणि उज्ज्वला मोडक हे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर प्रत्यक्षात बुधवारी त्या वायकर यांच्या प्रचारात सहभागी झाल्या. तर चेंबूरमधून प्रकाश फातर्पेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे इच्छुक उमेदवार आणि सह्याद्री मित्र मंडळाचे वाळूंज यांची समजूत काढण्यात मातोश्रीला यश आले. खासदार रमेश शेवाळे आणि चेंबूरचे उमेदवार फातर्पेकर यांनी मातोश्री घेवून जात उध्दव ठाकरेंची भेट घडवून दिली. त्यानंतर उध्दव ठाकरेंच्या सदिच्छा भेटीनंतर वाळूंज यांचीही नाराजी दूर झाली आणि ते शिवसेनेच्या प्रचारात सामील झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -