घरमहाराष्ट्रवंचित बहुजन आघाडीचा भाजपलाच फायदा - बी. जी. कोळसे पाटील

वंचित बहुजन आघाडीचा भाजपलाच फायदा – बी. जी. कोळसे पाटील

Subscribe

औरंगाबादमध्ये जनता दलाच्या बी. जी. कोळसे पाटलांना दिलेला पाठिंबा काढून घेत वंचित विकास आघाडीने एमआयएमला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावर कोळसे पाटलांनी आता नाराजी व्यक्त केली आहे.

औरंगाबादमधून बी. जी. कोळसे-पाटील यांना दिलेला पाठिंबा काढून घेत प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची ताकद एमआयएमच्या उमेदवाराच्या पाठिशी उभी केली. त्यातून एमआयएमचे स्थानिक आमदार इम्तियाज जलील जरी खूश झाले असले, तरी जनता दलाचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. ‘प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच ‘तुमचा पाठिंबा नको’, असं मी त्यांना सांगितलं होतं’, असं कोळसे पाटील यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितलं. तसेच, ‘१९७६पासून मी आंबेडकरांच्या विचारांना घेऊन काम करत आहे. पण एका झटक्यात ते सगळं तुटलं’, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. जाहीर सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी कोळसे पाटलांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर एमआयएमकडून दबाव वाढल्यामुळे ऐन वेळी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

‘भाजपला मदत करणं मला शक्य नाही’

दरम्यान, ‘काँग्रेससोबत आघाडी न करून मोदी-शहांना मदत करणं मला मान्य नाही’, असं देखील बी. जी. कोळसे पाटील म्हणाले. ‘मी रांचीमध्ये लालू प्रसाद यादवांना भेटायला गेलो होतो. त्यांना सोनिया गांधींशी बोलून प्रकाश आंबेडकरांना सोबत ठेवण्याचं आवाहन करण्यास सांगायला गेलो होतो. पण नेमकी त्याच वेळी इथे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत आघाडी शक्य नसल्याचं सांगत ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. मी आघाडीसाठी प्रयत्न करत असताना इथे मात्र आघाडी होत नसल्याचं जाहीर केलं’, असं देखील कोळसे-पाटील म्हणाले.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीवर दुसऱ्याच दिवशी उमेदवार बदलण्याची नामुष्की!

प्रकाश आंबेडकरांनी फसवलं?

पाठिंबा नाकारल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी फसवलं असं वाटतं का? असं विचारलं असता कोळसे-पाटील यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं. काँग्रेसच्या विरोधा वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसच्या वाट्याची दलित आणि मुस्लीम मतं विभागली जाऊन भाजपचाच फायदा होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेससाठी देखील आघाडी न होणं ही डोकेदुखी ठरू शकते.

इम्तियाज जलील यांची उमेदवारी निश्चित?

एमआयएमचे स्थानिक आमदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी औरंगाबाद मतदारसंघातून निश्चित मानली जात आहे. मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या उर्वरीत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -