घरमहाराष्ट्रविधान परिषदेसाठी भाजपने कंबर कसली, तीन उमेदवारांची नावे जाहीर

विधान परिषदेसाठी भाजपने कंबर कसली, तीन उमेदवारांची नावे जाहीर

Subscribe

Maharashtra Council Election | सध्या विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त आहेत. त्यात राज्यपाल नामनियुक्त १२ आणि सोलापूर, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली-सातारा, नांदेड,यवतमाळ, जळगाव, भंडारा- गोंदिया या ९ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा समावेश आहे.

Maharashtra Council Election | मुंबई – विधान परिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. येत्या ३० जानेवारीला होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नेमल्यानंतर आता तीन उमेदवारही जाहीर केले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कोकण मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख रविंद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत तिघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. हे तिघेही युतीतून लढणार आहेत.

हेही वाचा – विधान परिषदेसाठी भाजपने कंबर कसली; शिक्षक, पदवीधरसाठी निवडणूक प्रमुख घोषित

- Advertisement -

कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे, पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिक विधानपरिषद संदर्भात ११ जानेवारीपर्यंत निर्णय होईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान, या उमेदवारांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली असली तरीही ते युतीतून लढणार आहेत. या निवडणुकीसाठी पक्ष चिन्हांचा वापर केला जात नाही, असंही यावेळी सांगण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबरला महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक तर नाशिक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक घोषित केली. राज्यात गेल्या वर्षी सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. त्यासाठी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पक्षाच्या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

सध्या विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त आहेत. त्यात राज्यपाल नामनियुक्त १२ आणि सोलापूर, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली-सातारा, नांदेड,यवतमाळ, जळगाव, भंडारा- गोंदिया या ९ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा समावेश आहे.

भाजपचे विधान परिषदेत २२ इतके संख्याबळ आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपचे संख्याबळ कमी आहे. विधान परिषदेत आघाडीचे २८ सदस्य आहेत. संख्याबळ कमी असल्याने भाजपने आतापर्यंत विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक टाळली आहे. भाजपला आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत संख्याबळ वाढविण्याची संधी आहे. त्यामुळे भाजपने आपली शक्ती पणाला लावली आहे.

मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख

  • औरंगाबाद विभाग शिक्षक : आमदार राणा जगजितसिंह पाटील
  • कोकण विभाग शिक्षक : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
  • नागपूर विभाग शिक्षक : आमदार मोहन मते
  • नाशिक पदवीधर : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
  • अमरावती पदवीधर : आमदार डॉ. संजय कुटे
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -