घरताज्या घडामोडीराजकीय नेतृत्‍वाने निर्णय घेण्याची गरज; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

राजकीय नेतृत्‍वाने निर्णय घेण्याची गरज; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

Subscribe

राज्यात कोणत्याच ठिकाणी वरिष्‍ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयात समन्वय दिसून येत नाही. अशावेळी राजकीय नेतृत्‍वाने निर्णय घेण्याची गरज आहे, असा अनुभवाचा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला. कोरोना विरुध्दच्या लढाईत पहिल्‍या दिवसापासूनच आम्‍ही राज्‍य सरकारसोबत आहोत. केंद्र सरकारने भाजपाशासित राज्‍यांपेक्षा देखील जास्‍त मदत महाराष्‍ट्राला दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्‍हणतात कोणी अशा वेळी राजकारण करू नये. पण त्‍यांनी खरे पाहता त्‍यांच्या आसपासच्या नेत्‍यांनाच प्रत्‍येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवू नका असे सांगण्याची वेळ आली असल्‍याचा टोलाही त्‍यांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय नेत्‍यांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी आपले मत मांडताना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. गेल्‍या काही दिवसात जे निर्णय घेतले जात आहेत ते पाहता प्रशासकिय अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ वा समन्वय नसल्‍याचेच दिसून येत नाही. मुंबईत मुख्य सचिव अजोय मेहता असतील वा मुंबई महापालिका आयुक्‍त प्रवीण परदेशी असतील. पुणे-नागपूरमध्येही महापालिका आयुक्‍त तसेच पोलीस आयुक्‍त यांच्यात समन्वय दिसून येत नाही. यावेळी खरे तर राजकीय नेतृत्‍वाने निर्णय घ्‍यायचे असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये राजकीय नेतृत्‍वानेच समन्वय ठेवायचा असतो, असे देवेंद्र फडणवीस म्‍हणाले.

- Advertisement -

मुंबईत वाईनशॉप सुरू करण्याचा निर्णय चुकीचाच

ग्रीनझोनमध्ये एकवेळ ठीक आहे. पण मुंबईसारख्या प्रतिबंधित क्षेत्र जास्‍त असलेल्‍या भागात वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय योग्‍य नव्हताच. एक किलोमीटरच्या रांगांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. प्रतिबंधीत क्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या योग्‍य त्‍या मार्गदर्शक सूचनाही होत्‍या. पण तसे मुंबईत झाले नसल्‍याचे फडणवीस म्‍हणाले.

केंद्राकडून सर्वाधिक मदत महाराष्‍ट्राला

केंद्र सरकारने सुरुवातीलाच महाराष्‍ट्राला १६०० कोटी रूपये दिले. ४६८ कोटी रूपये मास्‍क, पीपीई किट आदी वैद्यकीय उपकरणांसाठी दिले. ३८०० कोटींचा टॅक्‍स ॲडव्हान्स दिला. भाजपाशासित राज्‍यांपेक्षाही जास्‍त मदत केंद्राने महाराष्‍ट्रालाच दिली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांच्या सूचना

कापूस, धान, तुरी, चणा आदी शेतमालाची खरेदी सुरू करावी.

- Advertisement -

जे मजूर चालत आपापल्‍या राज्‍यात जात आहेत त्‍यांना थांबवायला हवे. केंद्र सरकारने ट्रेनची व्यवस्‍था केली आहे. त्‍यांना ट्रेनमधून पाठविले पाहिजे.

पोलीस, आरोग्‍य कर्मचारी जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. त्‍यांना पगार कमी न देता उलट प्रोत्‍साहन भत्‍ता दिला पाहिजे.

लॉकडाऊन नंतर उद्योगधंद्यात काय उपाययोजना करता येतील, यासाठी त्‍या-त्‍या क्षेत्रातील तज्ञांचा टास्‍क्‍फोर्स तयार केला करावा.

मुंबईतील परिस्‍थिती गंभीर

मुंबईतील कोरोना रुग्णांचे आकडे पाहता परिस्‍थिती गंभीर होत चालली आहे. ती हाताबाहेर जाते की काय असे वाटायला लागले आहे.याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कोरोना पॉझिटिव्ह संख्येबाबतचा जो घोळ होतो आहे तो दूर केला पाहिजे.क्‍वारंटाईन सेंटरमध्ये जेवण निकृष्‍ट दर्जाचे आहे. शौचालयांची नीट व्यवस्‍था नाही.ती केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – CoronaVirus: ‘त्या’ व्हिडिओवरून विरोधकांनी राजकारण करू नका – राजेश टोपे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -