मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडत नाही तर कोरोनाबाधितांना कस सांभाळणार, राणेंचा हल्लाबोल

राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकण्याचे काम करतंय

BJP Leader Narayan Rane slams Cm Uddhav Thackeray on Corona vaccine shortage and medical facility
मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडत नाही तर कोरोनाबाधितांना कस सांभाळणार, राणेंचा हल्लाबोल

राज्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत यावर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत चांगलाच हल्लाबोल केला आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात लसींच्या पुरवठ्यावरुन होणाऱ्या वाद विवादांवरही भाजप नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. परमबीर सिंह आणि सचिन वाझेंच्या पत्रावरुनही भाजप नेते नारायण राणेंनी ठाकरेसरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यावर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र कमी पडला आहे. देशात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या आहे. तसेच हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचे गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नुसते केंद्राकडे बोट दाखवत आहेत. परंतु राज्यात मात्र रुग्णांना बेड्स नाहीत, नर्स नाही ही कोणाची जबाबदारी आहे? असा प्रश्न भाजप नेते नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. जसं माझं कुटुंब माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचं कुटुंब आहे तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणं, रुग्णांवर उपचार योग्यप्रकारे करणं त्यांना बर करणे ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात काय जाऊन बसत आहात. स्वतःला लॉकडाऊन करुन घेतलं आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही मग कोरोना होईल कसा? माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळी लोकं, रुग्णालयात कशी? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व कोरोनाबाधित रुग्णांना कसे सांभाळणार? हे सरकारचे अपयश आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार कमी पडले आहे. नेहमी केंद्राकडे बोट का दाखवता? असा प्रश्न भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकण्याचे काम करत आहे. जेवढे दिवस सरकारमध्ये आहात तेवढे दिवस शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम सरकारचा सुरु आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरु आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी पुढे म्हटले आहे की, सचिन वाझेला मुंबईतून १०० कोटी जमा करायला सांगितले आहे. हे आदेश केवळ अनिल देशमुख यांचे नाहीत. तर यात सगळे राज्याचे प्रमुख सहभागी आहेत. मग हे जमा केलेले पैसे लसीकरणासाठी का वापरत नाहीत? ते कुठे जातात? कोणाकडे जातात? याबद्दल काहीतरी सांगा. राज्यात बेड नाही व्हेंटीलेटर नाही असे सांगितले जात आहे. वॉर्ड बॉय,नर्स,डॉक्टर्स, यांची भरती कोणी करायची? असा सवाल देखील भाजप नेते नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.