घरट्रेंडिंगअहिराणी गाण्यांची बॉलीवूडलाही नशा

अहिराणी गाण्यांची बॉलीवूडलाही नशा

Subscribe

घडी ना काटा, झुमका वाली पोरने गाजवला डिसेंबर

 नाशिक : वाईन हब आणि कांद्याचे कोठार म्हणून परिचित नाशिक दोन ते तीन वर्षांपासून सर्वाधिक अहिराणी गाण्यांच्या निर्मितीमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. नाशिकच्या कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणावर अहिराणी गाण्यांची निर्मिती सुरू आहे. त्यामुळे कसमादेच नव्हे तर बॉलिवूडलादेखील अहिराणी गाण्यांची नशा चढलीय. चालू वर्षात ५० पेक्षा अधिक गाण्यांच्या निर्मितीचे लक्ष्य निर्मात्यांनी ठेवले आहे.

गाण्यांकडे मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. मोठमोठे निर्माते फक्त मनोरंजनाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून गाण्यांची निर्मिती करत असतात. परंतु, कसमादे भागातील तरुण गायक, वादक, लेखकांनी एकत्र येवून काळाआड होवू पाहणार्‍या गाण्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुर्ननिर्मित करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचाही या गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसून येतो. आजमितीला अहिराणी भाषेत अनेक नवनवीन गाणी तयार होत आहेत. ही गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियासारखे प्रभावी प्लॅटफॉर्म विनामूल्य उपलब्ध झाल्याने निर्माते, दिग्दर्शक, गायकांची संख्या वाढते आहे. या निर्मात्यांचे स्वत:चे यू-ट्यूब चॅनेल असल्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होवू लागल्या आहेत. विशेष म्हणजे फेसबुक, यू-ट्यूब, इन्स्टाग्रामवर रिल्सच्या माध्यमातूनही गाणी व्हायरल झाल्याने ग्रामीण भागातील कलाकारांना प्रसिद्धी मिळत आहे.

- Advertisement -

हल्ली लग्नकार्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलीवूडच्या गाण्यांपेक्षा अहिराणी गाण्यांची भुरळ पडल्याचे चित्र आहे. अहिराणी गाण्यांचे बजेट कमी असतानाही निर्माते कल्पकता वापरुन प्रेक्षकांना आवडतील अशा गाण्यांची निर्मिती करत असतात. अहिराणी गाण्यांचे मार्केट वाढू लागण्याने जिओ सावन, स्पॉटीफायसारख्या म्युझिक अ‍ॅपवरदेखील अहिराणी गाणी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळेही खान्देशची म्युझिक इंडस्ट्री येत्या काही वर्षातच बॉलीवूडलाही हेवा वाटेल अशी प्रगती करेल, असे मत निर्मात्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केले.

या गाण्यांची चलती

घडी ना काटा.., झुमकावाली पोर.., देख तूनी बायको कशी.., वाडी वाडी ये चंदन वाडी.., भारी नको भरू साली आय फोन वर.., कर मन लगण.., राजा तू तू मना राजा रे.., तुना प्यार मा पागल वयना ये.., ढोल्या उंबरनं फूल तोडू दे..

मला कल्पनेतून सुचलेल्या झुमकावली पोर या गाण्याला रसिकांनी भरभरून प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे खरोखरच मनापासून आभार. यावर्षीही अशीच नवनवीन गाणी मी आपल्यासाठी घेवून येणार आहे. प्रेक्षक मायबापांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास असाच टिकवून ठेवावा.
– विनोद कुमावत, अभिनेते, झुमकावाली पोर

 

मी स्वप्नातही विचार केला नव्हता की प्रेक्षक माझ्या गाण्यांना इतके भरभरून प्रेम देतील. मी सामान्य कुटुंबात वाढलो आहे. लहानपणापासूनच मला आपल्या अहिराणी गाण्यांना न्याय मिळवून द्यायचा होता. पुढच्या वर्षभरात मी व माझे सहकारी मिळून रेकॉर्डब्रेक गाण्यांची निर्मिती करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. – भैयासाहेब मोरे, लेखक-गायक, झुमकावाली पोर

 

पुढच्या वर्षभरात आम्ही या वर्षाच्या तुलनेत दुप्पट गाण्यांच्या निर्मितीचा मानस ठेवला आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा, आवड डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही गाण्यांची निर्मिती करत असतो.
– शशिकांत कचवे, निर्माते, साईसम्राट रेकॉर्डिंग स्टुडिओ, देवळा

 

बॉलीवूड गाणी फक्त कानांना समाधान देतात. त्याउलट अहिराणी गाणी मनाला समाधान देवून जातात. त्यामुळे प्रेक्षक आम्हाला पसंती देत आहेत. आम्ही प्रेक्षकांना नवनवीन गाण्यांची मेजवानी नव्या वर्षातही देत राहणार आहोत. – हितेन शिवदे, गायक, घडीना काटा

 

प्रेक्षकांनी आमच्यासारख्या स्थानिक कलाकारांवर जो विश्वास ठेवला तो टिकवून ठेवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत. या वर्षभरात अनेक नवीन गाणी आम्ही आपल्यासाठी घेवून येणार आहोत. – मेघा मुसळे, गायिका, आसावरी नि पावरी..

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -