घरमहाराष्ट्रकेवळ दोघांचेच मंत्रिमंडळ असल्यानं तिथच बसून जीआर काढतात, अजितदादांचं टीकास्त्र

केवळ दोघांचेच मंत्रिमंडळ असल्यानं तिथच बसून जीआर काढतात, अजितदादांचं टीकास्त्र

Subscribe

कारण तिथच बसून फाईल आली की एकानं सही करायची आणि मग दुसऱ्यानं सही करायची. तिथे सीएस असलं की सीएसनं सही करायची. सगळ्यांच्या सह्या होत असल्यानं ते पटापट जीआर काढत सुटल्याची टीकाही अजित पवार यांनी केलीय.  

मुंबई : राज्यात नवे सरकार येऊन एक महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्‍तार झालेला नाही. सध्या राज्यात दोघांचे जम्बो मंत्रिमंडळ आहे. उद्या  मंत्रिमंडळ बैठक होत असून दोघेच ही बैठक घेणार आहेत. उरलेल्‍या ४५ खुर्च्या त्‍यांच्याकडे बघत बसतील, असा टोला अजित पवार यांनी मंगळवारी शिंदे सरकारला लगावला. यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही?, असा सवालही पवार यांनी केला.

शिंदे सरकारने 1 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंतच्या 32 दिवसांत 728 जीआर काढले आहेत. त्यावरूनही अजित पवारांनी टोला लगावला आहे. मंत्रिमंडळात दोघेच असल्यानं त्यांना जीआरवर सही करण्यासाठी अडचणी येत नाहीत. जीआर काढण्याकरिता त्या दोघांना अडचण येत नाही. कारण तिथच बसून फाईल आली की एकानं सही करायची आणि मग दुसऱ्यानं सही करायची. तिथे सीएस असलं की सीएसनं सही करायची. सगळ्यांच्या सह्या होत असल्यानं ते पटापट जीआर काढत सुटल्याची टीकाही अजित पवार यांनी केलीय.

- Advertisement -

सध्या मुख्यमंत्री मिरवणुका, सत्कार सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. रात्री दहानंतर सभा घेता येत  नाही, तो एक नियम आहे. हा नियम सर्वांना मान्य हवा. राज्याचा प्रमुखच जर नियम मोडत असतील  तर पोलीस अधीक्षक तरी काय करणार? असा उद्विग्न सवालही अजित पवार यांनी केला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून खाली खेचत एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेऊन महिना उलटला तरी त्यांना मंत्रिमंडळ विस्तार करणे अजून शक्य झालेले नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्र्यांना  खाते  दिलेले  नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत. मात्र सहीअभावी फाईली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच मिळत  नाही. उपमुख्यमंत्री यांना अधिकारच दिलेला नाही. राज्य सरकारचे काम  गतीने व्हायला हवे आणि  जनतेची कामे झाली पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, विदर्भ – मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर  अजित पवार यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. या मागणीसाठी आपण उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला. परंतु त्यांनी केंद्र सरकारला अद्याप कळवले नाही असे दिसते. त्यामुळे केंद्राचे  पथक अजून पाहणी करायला आले नाही, असेही पवार म्हणाले.

विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभागाने आणि  सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाही. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी. काही ठिकाणी मनुष्यहानी झाली तिथे ४ लाखाची मदत मिळाली आहे. परंतु ती मदत तुटपुंजी असून  त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तत्काळ मिळायला हवी. अतिवृष्टी भागातील घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभे करण्याचे आव्हान सरकारसमोर असून सरकारने  तिकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.


हेही वाचाः उद्धव ठाकरेंचं नाव देशात झालं, ही गद्दारांची पोटदुखी; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -