घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टनागपुरात गडकरींच्या विकासाला पटोलेंचे आव्हान

नागपुरात गडकरींच्या विकासाला पटोलेंचे आव्हान

Subscribe

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यकाळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, या ठिकाणी काँगे्रसला मोठा जनाधार आहे, परंतु २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गडकरी निवडून आले, विशेष म्हणजे गडकरी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीतून जिंकून आले होते. मागील पाच वर्षांतील विकासकामांमुळे यंदाही त्यांची महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. मात्र त्याच वेळी काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी देऊन गडकरी यांच्यासाठी पेपर कठीण बनवला आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह वेगळ्या विदर्भाची भूमिका घेऊन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीदेखील निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे हे घटक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी त्रासदायक ठरणार आहेत.

नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असला तरी २०१४मध्ये या मतदारसंघातून भाजपचे नितिन गडकरी यांनी विजय मिळवून या मतदारसंघावर भाजपचे नाव कोरले. सार्वत्रिक निवडणुकीतून गडकरी प्रथमच २०१४ मधून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ गडकरी यांनी मागील ५ वर्षे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता यावेळीही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आपल्याकडेच रहावे, याकरता गडकरी कसोशीने प्रयत्न करत आहेत. कुणाच्याही राजकीय टिकाटिपण्णीकडे विशेष लक्ष न देता गडकरी विकासाच्या मुद्यांवर प्रचार करताना दिसत आहेत. मागील पाच वर्षांतील विकासकामे सांगून गडकरी मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे गडकरी यांना त्यांच्या कामाबद्दल आत्मविश्वास असून ते निवडून येतील, असा त्यांना विश्वास वाटत आहे.

- Advertisement -

गडकरी यांना जरी विजयाचा विश्वास वाटत असला, तरी काँग्रेसने त्यांच्याविरोधात नाना पटोेले यांना उमेदवारी दिली आहे. खरे तर या ठिकाणी विलास मुत्तेमवार पुन्हा एकदा इच्छूक होते, परंतू नाना पटोले यांनी भाजपसोडून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तसेच त्यांची आव्हानाची भाषा पाहून काँग्रेसश्रेष्ठींनी पटोले यांना भंडारा-गोंदियामधून नागपुरात आणले. पटोले यांना विदर्भात विशेष जनाधार आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसने गडकरीसमोर उभे केले आहे. पटोले यांच्या उमेदवारीमुळे गडकरी यांना ही निवडणूक नक्कीच सोपा पेपर नाही. पटोेले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे नागपूर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. सर्व गटाचे नेते आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. परंतु जानेवारी 2018ला काँग्रेसमध्ये परतलेल्या नाना पटोले यांना पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्यासोबतच काँग्रेसच्या परंपरागत मतदारांचे मन वळवावे लागणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसने मुस्लीम, दलित, ख्रिश्चन, हलबा या समाजातील मते आणि त्यांच्या जोडीला इतर मागासवर्गीय मतांची जोडही मिळेल, या अपेक्षेने पटोले यांना येथे उमेदवारी दिली आहे. नाना पटोले यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी नागपुरातील अनेक अनुसूचित जातीमधील काही बुद्धीवंत, कार्यकर्ते आणि संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ई-मेलद्वारे केली होती. खैरलांजी हत्याकांडानंतर नाना पटोले यांनी घेतलेली पक्षपाती आणि जातीय भूमिका, तसेच आरोपींच्या बचावासाठी केलेले प्रयत्न, आम्ही विसरु शकत नाही. त्यामुळे त्यांची नागपुरातील उमेदवारी या समाजाला दुखावणारी ठरेल, असा दावा त्यांनी ई-मेलमध्ये केला होता. नाना पटोलेंच्या विरोधामागे काँग्रेसचे अंतर्गत राजकारण असल्याचेही बोलले जात होते.

- Advertisement -

तसेच यंदा नागपूरमधून सुमारे ३० उमेदवारांनी अर्ज भरला आहे. या लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या वतीने महंमद जमाल शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकांमधील बसपची मतांची टक्केवारी दखल घेण्यासारखी आहे. कारण २०१४मध्ये बसपचे डॉ. मोहन गायकवाड यांनी ९३ हजार ४३३ मते मिळवली होती, तर २००९मध्ये बसपचे माणिकराव वैद्य यांनी १ लाख १८ हजार ७४१ मते मिळवली होती. त्यामुळे बसपचा या निवडणुकीत असलेला सहभाग काँग्रेस आणि भाजप यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. त्याचबरोबर नागपूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अ‍ॅड. सुरेश माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्त्वाखाली हा उमेदवार निवडणूक लढवत असून ते विदर्भाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या उमेदवाराच्या प्रचारामुळे गडकरी आणि पटोले या दोघांना विदर्भवाद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

१९५२ पासून १९९१ पर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात जरी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असला तरी १९९६ पासून याठिकाणी भाजपने विजय मिळवला, त्यानंतर मात्र १९९८पासून ते २००९पर्यंत या ठिकाणी काँग्रेसचे विलास मुत्तेमवार हे सलग निवडून येत राहिले. परंतु २०१४च्या मोदी लाटेत या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. २०१९मध्येही भाजपने या ठिकाणी नितिन गडकरी यांनाच उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन समाज पक्षाने प्रमोद ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -