विश्वासघाताने गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येईल, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

विश्वासघाताने गेलेलं सरकार मेहनतीनं पुन्हा आणता येतं असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच आगामी काळातही मोदींची सत्ता असेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकांमध्येही विजयी होऊ असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापुरातून भाजप नेते अमल महाडिक हे विजयी होतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजपकडून कोल्हापुरात अमल महाडिक यांना सतेज पाटिल यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. महाडिक हे विजयी होतील कारण विनय कोरे आणि प्रकाश आवडे आता आमच्यासोबत आहेत. कोल्हापुरात आता ६ वर्षांपुर्वी असलेली परिस्थिती राहिली नाही. कारण कोरे आणि आवडे आता आमच्यासोबत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीही ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपचे प्राबल्य वाढलं आहे. याचा फायदा भाजपला होईल आणि आमचा सदस्य विजयी होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अमल महाडिक हे भाजपचे तगडे उमेदवार मानले जात आहेत. ते सोमवारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील.

पंकजा मुंडे यांनाही प्रतिनिधित्व मिळेल – पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना देखील संधी मिळेल. आता चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन वर्षानंतर संधी देण्यात आली आहे. विनोद तावडेंना राष्ट्रीय कामकाजात संधी देण्यात आली आहे. त्यांचेही तिकीट कापलं होते. परंतु पंकजा मुंडे यांनाही येणाऱ्या वर्षात संधी मिळेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजपमध्ये सगळेजण संघटनेची जबाबदारी ही निवडणुकीच्या जबाबदारीपेक्षा मोठी मानतो त्यामुळे तिकीट कापणं हा विषय आमच्यासाठी मागे पडतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा : भाजपच्या संजय केणेकरांचा अर्ज मागे, डॉ. प्रज्ञा सातव यांची होणार बिनविरोध निवड