दिल्ली, चेन्नई दोन्ही विमाने रद्द, शिर्डीत विमान उतरलेच नाही

शिर्डी विमानतळावरील कमी दृष्यमानतेची समस्या कायम

UDAN 4.0

शिर्डी – आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिर्डी विमानतळावरील कमी दृश्यमानतेची समस्या तीन वर्षे लोटूनही कायम असल्याने, आज दिल्ली-शिर्डी आणि चेन्नई-शिर्डी ही दोन्हीही विमाने रद्द करण्यात आली. बुधवारी चेन्नईहून आलेले विमान थेट मुंबई विमानतळावर उतरवण्याची नामुष्की ओढवली होती. यानिमित्ताने शिर्डी विमानतळावरील नाईड लँडिंगची कमतरता आणि असुविधा चव्हाट्यावर आल्या आहेत.

कमी दृष्यमानतेमुळे गुरुवारी ( दि. १४ ) दिल्ली व चेन्नई येथून येणारी दोन्ही विमाने रद्द झाली असल्याची माहिती व्यवस्थापक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी दिली. १३ ऑक्टोबर रोजी कमी दृष्यमानतेमुळे चेन्नईहून १२६ प्रवासी घेऊन आलेले विमान मुंबई विमानतळावर उतरवावे करावे लागले होते. आजही दृष्यमानतेची समस्या जैसे थे असून त्याचा फटका दिल्ली व चेन्नई अशा दोन्ही विमानसेवांना बसला आहे. विमाने रद्द झाल्याने साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सव काळात  नियोजन करुनही अनेक भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागले.

शिर्डी विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून नाईट लँडिंगसाठी यंत्रणा उभी करण्याचे काम सुरू असून निधीअभावी हे काम धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे नाईट लँडिंग तर दूर, दिवसाही विमानसेवा ठप्प होत असल्याने शिर्डी विमानतळाची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी, अशी अपेक्षा साईभक्तांमधून व्यक्त केली जात आहे.