घरमहाराष्ट्रराज्याच्या विकासात कुणालाही आड येऊ देणार नाही, गडकरींच्या पत्राला मुख्यमंत्र्यांच उत्तर

राज्याच्या विकासात कुणालाही आड येऊ देणार नाही, गडकरींच्या पत्राला मुख्यमंत्र्यांच उत्तर

Subscribe

राज्यातील रस्ते कामांत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अडथळे आणले जात असल्याचा तक्रार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. ही तक्रार नितीन गडकरींनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवली. या पत्रावरून बराच वाद उफाळून आला. गडकरींना या पत्रात हा प्रकार असाच सुरु राहिल्य़ास, राज्यातील रस्त्यांची कामं मंजूर करताना विचार करावा लागेल. असा इशारा दिला होता. या पत्रावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. राज्याच्या विकासामध्ये कुणालाही आड येऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गडकरींना दिले आहे.

नागपूर मेट्रोच्या सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क या मार्गाचे आणि फ्रीडम पार्कचे उद्धाटन आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधताना गडकरींच्या पत्रावर उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमळ पण पत्र कठोर लिहिता. मात्र तुमचं-आमचं नात थोडं वेगळं आहे. तुम्ही कर्तव्यकठोर आहात आणि आम्हीही. शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे, की जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही. त्यांचा विश्वासघात करायचा नाही. ती शिकवण तुम्ही सुद्धा घेतली. जनतेच्या विकासाच्या कामाच्या कुणालाही आड येऊ देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राज्य सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे तिथे प्रत्येक पाऊलावर आपण एकमेकांसोबत राहून महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करू, हे करतांना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली.

काय लिहिले होते गडकरींच्या पत्रात

नितीन गडकरींनी शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामांमध्ये अडथळे आणून कंत्राटदारांना त्रास देत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्याना पत्राद्वारे केली होती. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या तीन ठिकाणी सुरु असलेल्या नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जातोय. यामुळे काम बंद पडेपर्यंत स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे. कामात अडथळे आणणारी ही परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल, असा गंभीर इशारा गडकरींनी या पत्रातून दिला होता.

- Advertisement -

कस्तूरचंद पार्क मेट्रो रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये

नागपूर मेट्रोच्या सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क या मार्गाचे आणि फ्रीडम पार्कचे उद्धाटन आज करण्यात आले. नागपूर मेट्रोचा हा सर्वात व्यस्त आणि महत्वपूर्ण भाग आहे जो शहरतील ऐतिहासिक वास्तुंना जोडतो, हा मार्ग सुरु झाल्याने शहरातील वाहतूक सुलभ होत सुमारे १ लाख प्रवासी मेट्रोशी जोडले जातील. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने “झिरो माईल फ्रीडम पार्क” ची निर्मिती करण्यात आली आहे. झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन हे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सर्वात अभिनव अशी रचना आहे. हे देशातील असे पहिले स्थानक आहे जे २० मजली आहे आणि ज्या चौथ्या मजल्यावरून मेट्रो गाड्या धावणार आहेत. येथे फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब टेक्नॉलॉजी अंमलात आणली आहे ज्यामुळे आवाज आणि कंपनी कमी होण्यास मदत होईल. कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन हे पारंपरिक भारतीय राजपूत वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विधानभवनसारख्या सर्वात महत्वाच्या आस्थापनांसाठी हे स्टेशन प्रवेशद्वार आहे. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय संग्रहालय देखील या स्टेशनच्या जवळ आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -