घरमहाराष्ट्रजशी युती २५ वर्षे टिकली तशी महाविकास आघाडी टिकेल; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

जशी युती २५ वर्षे टिकली तशी महाविकास आघाडी टिकेल; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Subscribe

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारला आता दीड वर्ष झालं आहे. हे सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा विरोधी पक्ष भाजप सातत्याने सरकार पडणार अशी भाकीतं करीत होते. भाजपच्या नेतेमंडळींकडून वारंवार सरकार कधी पडणार याचे मुहूर्त देखील सांगितले जात होते. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यामुळे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. यासंदर्भात आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. जशी भाजप-सेना युती टिकली तशी महाविकास आघाडी टिकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राज्यात सध्या सत्तेत असलेली महाविकासआघाडी किती काळ एकत्र राहील? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, कामं होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो. जशी युती टिकली, तशीच आघाडीही टिकेल. जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे? आमच्यात कुरबुरी असत्या, तर सरकार वर्ष-दीड वर्ष चाललंच नसतं. सरकार सुरू झालं, तेव्हा सरकार म्हणून सर्वात नवखा मुख्यमंत्रीच होता. या सर्व लोकांचं मला सहकार्य लाभतंय,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

माझ्या मनातही विचार नव्हता

तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. याची कल्पना जशी सर्वसामान्यांना नव्हती, तशीच ती उद्धव ठाकरे यांना देखील नव्हती. राज्यात या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं ही एक अकल्पित घटना होती असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. “तीन पक्षांचं सरकार कधी येऊ शकेल, हा माझ्याही मनात विचार नव्हता. अकल्पित असं घडलं किंवा घडवावं लागलं. यानंतर दुसरं अकल्पिक घडलं ते करोनाचं. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटतो. पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही करोनामुळे प्रत्यक्ष भेटीसाठी पोहोचू शकलेलो नाही. ऑनलाईन पद्धतीनेच कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

युतीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी युतीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती असं मत व्यक्त केलं. “आम्ही जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपासोबत देखील आमची युती २५ ते ३० वर्ष होती. तोंडदेखलं काही असेल तर ते योग्य नाही. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. आमची युतीमधून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -