Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार

पिसोळबारी घाटात चालत्या दुचाकीवर बिबट्याने चढवला हल्ला

Related Story

- Advertisement -

दरेगाव (ता. बागलाण) येथील तरुण शेतकरी युवकावर बिबट्याने हल्ला चढवत ठार केले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरेगाव येथील नंदकिशोर धोंडू पवार (वय 41) हे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. नंदकिशोर पवार हे आपल्या कुटुंबियांसह नांदीन शिवारात वास्तव्यास असून ते काल सायंकाळी दुचाकीवर दिघावे येथे अंडी घेण्यासाठी गेले होते. अंडी घेऊन परत घराकडे येत असताना दिसावे व नांदीन यांच्या दरम्यान असलेल्या पिसोळबारीच्या घाटात चालत्या दुचाकीवर त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना दुचाकीवरून खाली पाडत त्यांना जंगलात फरफटत नेत शरीराचे लचके तोडत ठार केले.

- Advertisement -

अंडी घेण्यासाठी सायंकाळी दिघावे येथे गेलेले नंदकिशोर पवार हे सकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता पवार यांची दुचाकी पिसोळबारी घाटाच्या पायथ्याशी आढळून आली. नातेवाईकांना पवार यांना बिबट्याने हल्ला करत खाली पाडले होते त्या ठिकाणाहून ओढून नेल्याचे निशाण दिसल्याने त्या दिशेने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत डोंगरावरील जंगलात निदर्शनास आला.

या घटनेची माहिती जायखेडा पोलीस व ताहाराबाद वनपरिक्षेत्र यांना देण्यात आली. जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश कांबळे आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. दरम्यान पवार यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

- Advertisement -