घरमहाराष्ट्रबेळगावबाबत महाराष्ट्र आक्रमक भूमिका घेणार; मुख्यमंत्र्यांचा निर्धार!

बेळगावबाबत महाराष्ट्र आक्रमक भूमिका घेणार; मुख्यमंत्र्यांचा निर्धार!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या जाहीर मुलाखतीमध्ये अनेक चर्चेतल्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर सीमाभागातील बेळगाव, धारवाड, निपाणी या भागातील मराठी गावांनी महाराष्ट्रात सहभागी होण्याचा लढा उभारला. अद्याप त्यांचा लढा सुरूच असून आता या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य आक्रमक भूमिका घेणार आसल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका जाहीर केली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची यावेळी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांची, सरकारची आणि शिवसेना पक्षाची देखील भूमिका मांडली. भाजपसोबत तुटलेली आघाडी, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झालेली महाविकासआघाडी आणि सरतेशेवटी मुख्यमंत्रीपदाचा स्वीकार या सर्वच मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी उत्तरं दिली.

केंद्र सरकारची भूमिका संतापजनक

यावेळी बेळगाव मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. ‘केंद्र सरकारने राज्यांचे पालक म्हणून नि:पक्षपाती भूमिका घ्यायला हवी. पण गेल्या ५ वर्षांमध्ये केंद्र सरकारने कोर्टात सातत्याने कर्नाटकची बाजू घेतली आहे. पण आता कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राबद्दल कठोर पावलं टाकावी लागतील. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण त्यासाठी मी राज्यातल्या दोन मंत्र्यांची नेमणूक केली आहे. या समितीच्या लोकांना बोलावून त्यांच्याशी मी बोलणार आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह सीमाभागातल्या मराठी बांधवांवर कर्नाटक सरकार भाषिक अत्याचार करतंय’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisement -

मी धर्मांतर केलेलं नाही

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपकडून केल्या जाणाऱ्या टिकेचा समाचार घेतला. ‘तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व आहे असं कुठे ब्रह्मवाक्य आहे का? आपण सर्वज्ञानी असल्याचा आव कुणी आणू नये. त्यांच्यापुरता दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करावा. सत्तेत भिन्न विचारधारेचे पक्ष आले असं तुम्ही म्हणला. पण केंद्रातल्या सरकारमध्ये किती विचारधारेचे पक्ष आहेत?’ असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. तसेच, ‘नितीशकुमार, मेहबुबा मुफ्ती, चंद्राबाबू, ममता बॅनर्जी, जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान यांची आणि भाजपची विचारधारा एक आहे का?’ असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मी छप्परातून आलोय…

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी अद्याप उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सभासद नाहीत. त्यामुळे निवडणूक लढवून विधानसभेत जाणार की निवडणूक न लढवता विधानपरिषदेत जाणार, याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कुणी म्हणतं मागच्या दारातून, पुढच्या दारातून, मी म्हणतो मी छपरातून आलोय. निवडून आलेल्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यांना दुखावून मी विधानसभेत जायचं. त्यापेक्षा कुणालाही न दुखावता जे शक्य असेन ते मी करेन. जर कुणाला न दुखावता विधानपरिषदेत जाता येत असेल, तर का नाही जायचं?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -