घरताज्या घडामोडीBypoll 2021: देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी, भाजपचा दारुण पराभव

Bypoll 2021: देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी, भाजपचा दारुण पराभव

Subscribe

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा ४१ हजार ९१७ मतांनी पराभव केला. या विजयाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे.

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूरच्या जागेसाठी ३० ऑक्टोबरला मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली होती. पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, देगलूरच्या मतदारांनी काँग्रेसवर विश्वास टाकला. देगलूरची पोटनिवडणूक जिंकून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे नेते अशोक चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला कायम राखला आहे.

- Advertisement -

या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ७८९ तर भाजपचे सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना ११ हजार ३४७ मते मिळाली.

आघाडी सरकारच्या कामाला पोचपावती – नाना पटोले

दरम्यान, देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा विजय हा काँग्रेस पक्षावरचा जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. हा विजय महाविकास आघाडी सरकारवरच्या कामाला जनतेने दिलेली पोचपावती आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप यांच्यासह स्थानिक जनता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे या विजयाबद्दल मनापासूनच धन्यवाद, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

- Advertisement -

देगलूरची जागा काँग्रेस पक्षाचीच होती. पोटनिवडणुकीत ही जागा अधिक मताधिक्क्याने कायम राखली. भाजपला या मतदारसंघात उमेदवारही मिळाली नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार बळजबरीने उभा केला. पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. महाविकास आघाडी सरकार या निकालाने अधिक भक्कम झाले आहे. महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजप  आणि त्यांच्या गलिच्छ राजकारणाला जनता कंटाळलेली आहे हेच यावरून दिसते, असेही पटोले म्हणाले.

दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा 

दादरा नगर हवेली येथे शिवसेनेच्या कलाबेन डेलकर या उमेदवाराचा पहिलाच असा महाराष्ट्राबाहेरचा विजय आहे. या विजयाबद्दल पर्यटन मंत्री आदित ठाकरे म्हणाले की, ‘दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -