घरमहाराष्ट्रराज्याला कोविशिल्डचे ९ लाख डोस

राज्याला कोविशिल्डचे ९ लाख डोस

Subscribe

१५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्याला कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले असून त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे दिली. राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत असल्याचे टोपे यांनी सांगितले. स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू आहे. दर निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते. आज राज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरुवात झाली असून आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य सरकारने रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसिवीर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टँक उपलब्ध होतील. जेणेकरून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल, असे टोपे म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -