नागपुरात धडकला करोना; अमेरिकेतून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह

अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. बुधवारी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार या व्यक्तीला करोना झाल्याचे पुढे आले. नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

नागपुरातील ११ संशयित रुग्णांपैकी ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांचे अहवाल यायचे होते. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास हा अहवाल प्राप्त झाला असून यात एकाला करोना असल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तीचे वय ४५ ते ५० च्या दरम्यान असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. अमेरिकेतून आल्यानंतर ही व्यक्ती नागपुरात कुणा कुणाच्या संपर्कात आली याचा शोध घेणे सुरू आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आता काळजी घ्या

आता नागपुरातही करोनाचा रुग्ण आढळल्याने नागपूरकरांनी आता अधिक सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. करोना कुणाला झाला आहे, हे प्रथमदर्शनी लक्षात येत नसल्याने नागरिकांना सर्वांपासूनच दूर अंतर ठेवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्विमिंग पूलचा वापरही शक्यतो टाळावा, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

हे करा

-गर्दीच्या ठिकाणई जाऊ नका
-स्विमींग पूलचा वापर करू नका
-हस्तांदोलन करू नका
-नाका, तोंडाला हात लावू नका
-वेळोवेळी हात स्वच्छ धुवा