घरमहाराष्ट्रऐन पेरणीच्या काळात भात बियाण्यांचा तुटवडा

ऐन पेरणीच्या काळात भात बियाण्यांचा तुटवडा

Subscribe

महाबिजचा या वर्षीही गोंधळ

महाड तालुक्यातील शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली असली तरी महाबिजच्या सुवर्णा जातीच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. महाबिजचे हे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी कंपनीचे महाग बियाणे विकत घ्यावे लागत आहे. रोहीणी नक्षत्राच्या धुळवड पेऱ्याला महाड तालुक्यात सुरुवात झाली आहे. तालुक्यातील एकूण १३ हजार ६०० हेक्टर भातशेतीपैकी बहुतांशी शेती ही पाणथळी शेती आहे. तसेच तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने १४० ते १४५ दिवस लागणाऱ्या वाणाचा जास्त प्रयोग केला जातो. त्यामुळे महाडमधील शेतकरी हे महाबिजच्या सुवर्णा या बियाण्यांचा जास्त वापर करतात.

कृषी विभागाकडून या वर्षी महाबिजकडे सुवर्णाच्या ७०० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र महाबिजकडून केवळ २६५.८ क्विंटल एवढाच पुरवढा करण्यात आला आहे. महाड तालुक्यासाठी महाबिजकडून विविध विक्रेत्यांकडे या बियाण्याचा ९०० ते एक हजार प्रती २५ किलो या दराने पुरवठा करण्यात येतो. मात्र या सर्व विक्रेत्यांनी दुकानाबाहेर सुवर्णा बियाणे उपलब्ध नसल्याचा बोर्ड लावल्याने ऐन पेरणी हंगामात महाबिजचे हे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वेळेवर पेरा व्हावा यासाठी शेतकरी नाईलाजाने दुपट्ट दराने खाजगी कंपनीचे बियाणे विकत घेत आहेत. तर बहुतांशी शेतकरी भातगिरणीतून भात खरेदी करून त्याचा बियाण्यासाठी उपयोग करीत आहेत. मात्र ही बियाणे अशुद्ध असल्याने याचा भातपीकावर परिणाम होतो. तर खासगी बियाण्यांची विक्री व्हावी, याकरिता महाबिजकडूनच हा तांत्रिक तुटवडा निर्माण केला गेला असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -