घरताज्या घडामोडीनिमोणच्या कोरोनाबाधिताचा नाशिकमध्ये मृत्यू

निमोणच्या कोरोनाबाधिताचा नाशिकमध्ये मृत्यू

Subscribe

जिल्ह्याबाहेरील आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

शनिवारी रात्री संगमनेरचा तिसरा कोरोना बळी गेला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या संगमनेरमधील निमोणच्या बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. निमोणमध्ये आत्तापर्यत दोन तर धांदरफळमध्ये एकाचा बळी गेला असल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण संख्येबरोबरच बळींची संख्यादेखील संगमनेरात सर्वाधिक आहे. सलग तीन बळी गेल्याने संगमनेर हादरले असतांनाच नगरच्या प्रयोगशाळेतुन आलेल्या अहवालात जिल्ह्याबाहेरील चार जणांना करोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या चारही व्यक्ती मुंबई, उल्हासनगर, तुर्भे आणि आैरंगाबाद येथील आहेत.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका कोरोना बाधीत रुग्णाचा काल रात्री नाशिक येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ०७ झाली आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ७४ असून जिल्ह्याबाहेरील बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, घाटकोपर येथील महिलेचा रिपीट अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अन्य चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी सकाळी नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या चार व्यक्ती बाधीत आढळून आल्या. यातील एक २६ वर्षीय व्यक्ती १७ मे रोजी मुंबईहून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आली होती. दुसरी ६० वर्षीय बाधीत व्यक्ती तुर्भे, मुंबई येथून २२ मे रोजी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आली होती. तिसरी ३२ वर्षीय बाधीत व्यक्ती औरंगाबाद येथून २० मे रोजी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आली होती. नेवासा बुद्रुक येथे २२ मे रोजी उल्हासनगर येथून आलेली ६० वर्षीय महिलाही बाधीत आढळून आली आहे. याशिवाय, काही दिवसापूर्वी बाधीत आढळलेल्या घाटकोपर येथील महिलेचा दुसरा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, नाशिक येथे उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका रुग्णाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. नाशिक पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे ते वडील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -