ते १९ आरोपी नशीबवान, फाशीची झाली जन्मठेप

१९ आरोपींच्या फाशीची झाली जन्मठेप

फाशी टळली

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीच्या दयेच्या अर्जाची दखल घेऊन त्याच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याचा अधिकार देशाच्या राष्ट्रपतीना आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील याच्या कार्यकाळात फाशीचे रुपांतर जन्मठेपेत होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे, असे माहिती अधिकारात समोर आले आहे. सन 2007 ते 2012 या कालावधीत तब्बल 19 आरोपींना प्रतिभाताईंच्या दयाबुद्धीचा लाभ झाला. मागील ३८ वर्षातील हा सगळ्यात मोठा आकडा आहे.

सन 1981 ते जून 2018 या कालावधीत 138 आरोपींना विविध गुन्ह्यांमध्ये सर्वोच्च न्यायालायाने फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशीची शिक्षा रद्द होण्यासाठी आरोपींकडून देशाच्या राष्ट्र्पतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्यात येतो. गुन्ह्याचे स्वरूप तसेच आरोपीची स्थिती पाहून राष्ट्र्पतींकडून आरोपीच्या अर्जाची दखल घेऊन सुनावणी होते. त्यापैकी काही आरोपीचा दयेचा अर्ज रद्द करण्यात येतो तर काही अर्जांचा विचार करून त्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात येते.

मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीचा अधिकार वापरून 1981 सालापासून ते 2018 पर्यंत फाशीची शिक्षा झालेल्या व ती शिक्षा जन्मठेपेत रूपांतर झालेल्या आरोपीची माहिती मागवली होती. फाशीची जन्मठेप झालेल्या 138 जणांची माहिती शकील अहमद शेख यांना देण्यात आली.

शकील अहमद यांच्या म्हणण्यानुसार तसेच माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीनुसार फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीपैकी सर्वाधिक दयेच्या अर्जांवर 2007 ते 2012 या कालावधीत सुनावणी झाली. या कालावधीत प्रतिभा पाटील राष्ट्रपती होत्या. त्याच्या कार्यकाळात तब्बल 19 जणांची फाशीचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले. प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात 22 दयेचे अर्ज आले होते. त्यातून 19 जणांना दया दाखवण्यात आली. 3 अर्ज नाकारण्यात आले.

* माजी राष्ट्रपती झैलसिंग यांच्या 1982 ते 1987 या कार्यकाळात 22 दयेचे अर्ज आले होते. त्यापैकी 19 दयेचे अर्ज रद्द करण्यात आले. तिघांची फाशी जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात आली.

* 1987 ते 1992 या काळात माजी राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांंच्यासमोर 39 दयेचे अर्ज आले होते. त्यांनी सहाजणांना दया दाखवली. 33 अर्ज नाकारले.

*माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या कार्यकाळात त्यांनी 12 दया अर्ज रद्द केले. प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात 35 दयाअर्जांपैकी 4 आरोपींच्या फाशी जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात आली.

* माजी राष्ट्र्पती एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळात दोन दयेचे अर्ज आले. त्यापैकी त्यांनी एक अर्ज नाकारला. तर एकाच्या फाशीचे जन्मठेपत रुपांतर केले.