घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदीड आणा नाके, जुना पुणे रोड "सारडा सर्कल"

दीड आणा नाके, जुना पुणे रोड “सारडा सर्कल”

Subscribe

मुंबईवरून नाशिकला येताना नासर्डी नदी ओलांडली की, नाशिक गावात जाण्यासाठी जुना आग्रा रस्ता पोलीस रहदारी केंद्र व वासन ऑटोमोबाईल्स यांमधून जाणार्‍या रस्त्याने नॅशनल उर्दू हायस्कूल प्रवेशद्वाराकडून शिंगाडा तलावाकडून सध्याच्या गडकरी चौकातून दक्षिणोत्तर थेट अशोक स्तंभाकडून रविवार कारंजाकडे जात असे. गडकरी चौक, कालिका मंदिर, मोटकरवाडी, महामार्ग बसस्थानक हा रस्ता बैलगाडी किंवा पायी जाणारा अविकसित रस्ता होता. नंतर तो विकसित करण्यात आला व नासर्डी नदीपासून सरळ गडकरी चौकास मिळविण्यात आला. याशिवाय पुणे-नाशिक मार्ग हा भगूर, देवळाली, नाशिकरोड येथे मिळणारे रस्ते पुणे रस्ता या नावाने ओळखला जात असे. या दोन्ही रस्त्यांनी नाशिक गावाशी संपर्क साधणारे व पुढे राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळालेले रस्ते एकत्र होत असत ते याच चौकात.

नाशिक गावात प्रवेश करताना वडाळा नाका रेणुका बागेसमोरील रस्ता प्रामुख्याने मुख्य रस्ता होता. तसा हा चौक गावातील हद्दीजवळचा मुस्लीम कालखंडातील जहाँगीर मशीद व तेथील कब्रस्तान, इंग्रज काळातील ख्रिश्चन मंडळींचे उर्दू हायस्कूल ते शिंगाडा तलावासमोर वेताळ मंदिरापर्यंत कबरस्तान शिंगाडे तलावालगतचे ज्यु यहुदी मंडळींचे छोटे कब्रस्तान अशी स्मशान अवकळा असलेले वातावरण असा चौकाचा हा परिसर होता. नाशिक गाव अस्तित्वाचे प्रामुख्याने तीन लेखी पुरावे उपलब्ध आहेत. इसवीसनपूर्वी २०० वर्षे म्हणजे २२०० वर्षांपूर्वी पांडवलेणी येथील शिलालेखात नाशिकचा उल्लेख आहे. सन १००० ते १४०० या कालखंडात यादवांच्या अधिपत्याखाली नाशिक आले. या कालखंडात शिवमंदिरे बांधली गेली. तेव्हा नाशिकची वस्ती गोदावरी व पंचवटी या नद्यांच्या किनार्‍यालगत होती. सन १३०० नंतर १६६० पर्यंत मुस्लीम अंमलाखाली नाशिक आले व त्यावेळी जी लोकवस्ती झाली ती औरंगजेबाच्या काळात मुस्लीम नाशिक या नावाने व काही काळानंतर गुलशनाबाद या नावाने रूढ झाली. सन १६०० च्या अखेरच्या पर्वात म्हणजे विशेषतः पहिल्या बाजीरावांच्या कारकीर्दीत नाशिक मराठी राज्यात आले. तीर्थक्षेत्र नाशिक हे पूर्ववत नाव देण्यात आले.

- Advertisement -

या परिसरात नंदिनी (नासर्डी) नदीच्या जिवंत पाण्याच्या झर्‍यामुळे मोठा प्रवाह या चौकाजवळ नैसर्गिकरित्या निर्माण झाला. तेथे शिंगाडा तलाव बांधण्यात आला. याच चौकात पूर्वीचा सरस्वती ओढा व पुढे परावर्तित झालेला सरस्वती नाला यांचा संबंध इतिहासातून स्पष्ट होतो. नाशिक शहराचे पिण्याचे पाणी – आरोग्य व करआकारणी यांच्याशी निगडित हे दुवे. म्हणून यासंबंधी लिहिणे आवश्यक वाटते.

सरस्वती नाला व सरस्वती ओढा यांचा प्रारंभ याच चौकातून होतो. नंदिनीच्या झिरप्याच्या पाण्याचा प्रवाह मातीच्या ओघळीतून वाहत ओढ्यासारखा रूपांतरित झाला. या चौकालगत मुस्लिम अंमलात मुस्लिमांची वस्ती वाढली. या ओढ्याचे – सरस्वतीचे पाणी लोक पिण्यासाठी वापरत असत. त्यासाठी प्रवाह रूंद केला. तथापि, लोकांनी आपल्या गटाराचे व इतर सांडपाणी या प्रवाहात सोडण्यास प्रारंभ केला. त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली आणि १८६४ मध्ये पालिकेच्या स्थापनेनंतर १८७३ मध्ये शिंगाडा तलाव ३०,००० हजारांस खरेदी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. नाला उपसणे, केरकचरा-दगड गोटे काढणे यासाठी प्रथमत: १८७४-७५ मध्ये घरपट्टी प्रथमत: एक रूपया व भंगीपट्टी दीड रूपया अशी आकारणी होती. पुढे १८७९-८० मध्ये घरपट्टी २ रूपये व सन १८७७-७८ मध्ये भंगीपट्टी ३ रूपये होती, तर १८७९-८० मध्ये भंगीपट्टी साडेचार रूपये झाली.

- Advertisement -

१८६९ मध्ये सारडा चौकातील प्रारंभ होणार्‍या व गावात जाणार्‍या या सरस्वती प्रवाहाचे नैसर्गिक वैशिष्ट्य अबाधित ठेवण्यासाठी पालापाचोळा, माती, दगड काढून नाला स्वच्छ ठेवण्याच्या निमित्ताने नाशिक गावात प्रथमत: जकात कर बसविण्यात आला. म्हणूनच पुणे-नाशिक व मुंबई-नाशिक रस्त्यांच्या चौफुलीवर जकात नाके (प्रथमत: लोक दीड आण्याचे नाके या नावाने या नाक्याचा उल्लेख करत.) मुंबई नाके बांधण्यात आले. या चौकातील सरस्वती नाला शहरातून रामसेतू पुलापर्यंत वाहत असे. त्याचा प्रारंभ या चौकातून होत असल्याने नगरपालिकेचा मालावरील जकात कर सुरू झाला. यासंबंधी या टॅक्सबाबत मुंबई गव्हर्नरांकडे नगरपालिकेचे सदस्य व नाशिकमधील नामवंत वकील वासुदेव हरी निरंतर यांनी पुढाकार घेऊन २०० नागरिकांचा तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यात टॅक्स डोईजड व अन्यायकारक आहे, असे नमूद केले होते. यासाठी पुढील कारणे नमूद केली होती. अनंत कान्हेरे यांनी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला. त्याचे थडगे या सारडा सर्कल परिसरातील ख्रिस्ती कब्रस्तानात आहे. गोठी आयर्न वर्क्स कारखाना, जुन्या नाशिकचे वैभव असलेली रेणुका बाग, अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले रेणुका मंदिर सारडा सर्कलजवळ आहे. हौदाच्या बंगल्यात भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला. त्यांची लॅबोरेटरी पटवा यांच्या बंगल्याच्या जागेत होती. प्रसिद्ध सैनिक बॅरिस्टर माणिकलाल भटेवरा व त्यांच्या पत्नी महिला स्वातंत्र्यसैनिक शांतीदेवी माणिकलाल भटेवर यांचे वास्तव्य असलेले अलोन निवासस्थान याच चौकात आहे.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -