घरमहाराष्ट्रनाशिकउत्तुंग कर्तृत्वाच्या माणसांची गल्ली "दिल्ली दरवाजा"

उत्तुंग कर्तृत्वाच्या माणसांची गल्ली “दिल्ली दरवाजा”

Subscribe

जुन्या काळी जेव्हा वाहतूक साधने नव्हती तेव्हा नाशिक व पंचवटी यांना जोडणारा मुख्य रस्ता मुंबई-आग्रा मार्गावरुन जात होता. दिल्लीकडे जाणारा रस्ता येथे मोगल सरदाराने दरवाजा उभारला म्हणून हा विभाग दिल्ली दरवाजा नावाने ओळखला जाऊ लागला. गोदाकाठाने जाणारा भाग ते नेहरू चौकापर्यंत दिल्ली दरवाजा या नावाने ओळखला जातो. पेशवेकालीन गंगाघाटाची सुधारणा व मंदिराच्या निर्मितीनंतर गोदावरी काठी धार्मिक विधी व पंचवटीमधील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पहाटे चारपासून रात्री नऊपर्यंत नदीच्या दोन्ही तीरांवर गंगा गर्दीने गजबजलेली असे. भाविकांपासून, गुलजार गुलाबी आंबट शौकिनांपासून कुटुंबवत्सल मंडळी सहकुटूंब मोठ्या संख्येने मोकळ्या हवेत सायंकाळी गोदाकाठी जमत. त्यामुळे खर्‍या अर्थाने चौपाटीचे स्वरूप प्राप्त झालेले असे. पंचवटीकडील पेशवे पटांगणात पूर्वीच्या वाळवंटात भाजीबाजार नेहमी भरत असे. बुधवार, शनिवारचा मुख्य बाजार याच दिल्ली दरवाजाच्या मुख्य पटांगणात भरत. आजही तो भरतो.

नाशिकच्या लौकिकात भर घालणारे देशभर प्रसिद्ध असलेले कोंडाजी, मकाजी, गडकरी, जी. के. यांची चिवड्यांची दुकाने व दस्तुरखुद्द कोंडाजी वावरे व मकाजी इसेबाबा खास पद्धतीचा फेटा बांधून दुकानावर चिवड्याची विक्री करत असत. प्रारंभीच्या काळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व विशेषत: परगावहून आलेल्या यात्रेकरू, प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी सहायक मंडळी ओरडून चिवडा घेण्याचे व नमुना घ्या असा पुकारा करायचे. प्रसिद्ध खंडेरावाच्या मंदिरासमोर पाणीपुरी, भेळभत्ता, लीलाराम उबालाल रघुनाथ चव्हाण या लोकप्रिय मंडळींची दुकाने, चवरे यांचे ऊसाच्या रसाचे गुर्‍हाळ, तर आईस्क्रीमसंबंधी दराडे बंधू व करवल बंधू आणि लखपती यांची दुकानेही होती. दिल्ली दरवाजाच्या उत्तरेला धर्मशाळा, कोट बांधण्यात आला त्यास कापूरथळा कोट म्हणतात.

- Advertisement -

नदीपात्रालगत कापूरथळा संस्थानचे राजे रणधीरसिंह परदेशात जात असताना एडन येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १८७० मध्ये त्याकाळी १३ हजार रूपये खर्चून (छत्री) स्मारक बांधण्यात आले. ३० फूट उंचीचे हे स्मारक संगमरवरी नक्षीकाम व चौफेर सिंहाचे अत्यंत सुबक पध्दतीचे चौफेर मुखवटे असलेले आहे. रानातून आणलेली करवंद, जांभूळ, गावठी आंबे, तुकुमराई तत्सम रानमेवा येथे विक्रीसाठी आणला जात. अलीकडे जांभूळ वजनावर व सोन्यासारखे तोलून गुंजामासादेखील अधिक जाता कामा नये अशा व्यवहार तंत्राने विकली जातात. तेव्हा मात्र वाट्याला वाटा फुकट अशी व आंबा चाखून पाहण्यासाठी सढळ हाताने विक्रेता ग्राहकांच्या हातावर ठेवीत असत. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरात प्रवेश करणारा गरूड रथ याच मार्गाने शहरात प्रवेश करीत असे. पूजाविधी, आरास, सुवासिक सडा, पानाफुलांच्या रांगोळ्या, सनई-चौघड्यांच्या निनादात रथाचे स्वागत करण्याची तेव्हाची प्रथा आजही सुरू आहे. पूर्वी निघणार्‍या रंगपंचमीच्या गाड्या व श्रीगणरायाचे गंगेकाठी विसर्जन याठिकाणी केले जात. शहरातून म्हशींचा तांडा नदीपात्रात येताना व जाताना सकाळच्या वेळी रहदारी ठप्प होत असे. मनसोक्त डुंबणार्‍या म्हशी पाहून यात्रेकरूंना आश्चर्य वाटे. पूर्वी ब्रह्मवृंदाला गायी दान देण्याची विशेष पद्धत होती. तिवंधा, सोमवार पेठ ही ब्रह्मवृंदांची निवासस्थाने होती. तेव्हा गाई रानात चरण्यासाठी घेऊन जाणारे गोपाळ मंडळी याच पटांगणात, नेहरू चौकात सकाळी एकत्र गायी जमवून शहराच्या मुख्य रस्त्याने गावाबाहेर नेत असत आणि सायंकाळी परतीचा मार्गही हाच असे.

नदीकाठी विटांच्या भट्ट्या होत्या. नाशिकच्या विविध भागातील घरात नवीन बांधकामे आणि दुरुस्त्यांसाठी लागणार्‍या विटा, वाळू व माती वाहून नेणार्‍या गाढवांचा तांडादेखील याच मार्गाने जात असे. म्हशी, गाई व गाढवांचा गोंधळ ही रोजची सर्कस नाशिककर अनुभवत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन यांच्या प्रचंड सभा येथे झाल्या. साने गुरुजींच्या निधनानंतर या पटांगणास साने गुरुजी पटांगण असे नाव देण्यात आले. दिल्ली दरवाजाच्या जवळच नाशिकच्या रंगपंचमीचे वैशिष्ट्ये व जुनी परंपरा असलेली रहाड आजही अस्तित्त्वात आहे. अनेक मान्यवरांच्या समाध्या याठिकाणी आहेत. पेशव्यांचे स्थानिक कोषधिकारी व ओकांचे कचेरीप्रमुख भिडे महाराज यांची समाधी दरोडे यांच्या हॉटेललगत आहे. समाधीस्थळाभोवती नाशिकच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटविणारी दिग्गज मंडळी २० वर्षांहून अधिक काळ भिडे यांच्या समाधीच्या दगडी कट्ट्यावर एकत्र येत.

- Advertisement -

नित्यनेमाने निरपेक्ष एकत्र जमून वैचारिक आदानप्रदान करत. त्यात प्रामुख्याने सखाराम वामनशास्त्री दातार यांचा पुढाकार होता. माजी नगराध्यक्ष सदाशिव भोरे, वह्यांचे व्यापारी व अर्थतज्ज्ञ गाडगीळ आदींचा समावेश होता. गोदावरीकाठी असलेल्या अनेक तीर्थस्थानांमध्ये आनंदनिधान हे तीर्थ असल्याचा उल्लेख आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हे प्राचीन तीर्थ कोठे असावे, याचा शोध लागला नाही परंतु हे आनंद निधान तीर्थ म्हणजेच या समाधीस्थळाजवळील या मंडळींची बैठक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिल्ली दरवाजापासून नेहरू चौकाकडे जाणार्‍या रस्त्याच्या प्रारंभी सिद्धेश्वराचे मंदिर आहे. नाशिकच्या धार्मिक, सामाजिक व न्याय संस्थेशी निगडीत असलेले दिवंगत कायदेतज्ज्ञ भाऊसाहेब देशपांडे यांचा वाडा आहे. त्यांचे शरद देशपांडे व अ‍ॅड. उज्ज्वल देशपांडे यांनी आपल्या काकांची उज्ज्वल परंपरा पुढे चालवून नाशिकनगरीत अव्वल दर्जाची विश्वासार्हता जोपासली!

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -