एसटी संपावर लवकर तोडगा काढण्यासाठी आम्ही मदत करु; फडणवीसांची अनिल परब यांना ग्वाही

देवेंद्र फडणवीस यांची अनिल परब यांच्याशी चर्चा

devendra fadnavis

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघावा म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप फार काळ सुरू राहणे चांगले नाही.त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून कर्मचाऱ्यांची समस्या निकाली काढाव्यात आणि त्यासाठी आम्ही मदत करू, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी परब यांना दिली.

एसटी कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने आज फडणवीस यांची भेट घेतली. प्रत्येक विभागातील कर्मचारी आणि महिला प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या कथन केल्या. यावेळी भाजप पूर्णपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

बुलढाण्यात एका कर्मचार्‍याने आत्महत्या केली. अन्य एका कर्मचार्‍याचा भीतीने मृत्यू झाला.एसटी कर्मचार्‍यांचे मृत्यू वाढतच आहेत. त्यामुळे तत्काळ चर्चा करून समस्या सुटल्या पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.