रेशनवर दिवाळी किट मिळणार 20 ऑक्टोबरनंतर, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य सरकारने साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल 100 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार हा शिधासंच (दिवाळी किट) 19 आणि 20 ऑक्टोंबरपर्यंत जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येईल आणि त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

दिवाळीचा सण लक्षात राज्य सरकारने 4 ऑक्टोबरच्या बैठकीत शिधापत्रिकाधारकांना अवघ्या 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळी तोंडावर आली तरी नागरिकांना सरकारच्या घोषणेनुसार नागरिकांना हे दिवाळी किट मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील वितरणव्यवस्थेचा आढावा घेतला. दिवाळीपूर्वी या हे दिवाळी किट पात्र शिधापत्रिकाधारकांपर्यंत योग्य पद्धतीने लवकरात लवकर कसा वितरीत होईल याचे नियोजन करा, असे निर्देश चव्हाण यांनी यावेळी दिले.

या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांची दिवाळी गोड व्हावी, हेच आमचे ध्येय आहे. 19 आणि 20 ऑक्टोंबरपर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येतील. त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.

राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख, प्राधान्य कुटुंबातील 1.37 कोटी, औरंगाबाद आणि अमरावती विभागांतील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या चौदा जिल्ह्यांतील एपीएलमधील (केशरी) सुमारे 9 लाख शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 1 किट वितरित करण्यात येणार आहे. असे एकूण 1 कोटी 71 लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना हे दिवाळी किट वितरित करण्यात येणार आहे. हे दिवाळी किट पात्र शिधापत्रिकाधारकांना ई- पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये या सवलत दराने वितरित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय पारदर्शक आहे. त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आली. 9 निविदा प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी 6 कंपन्या पात्र ठरल्या, त्यापैकी 5 कंपन्यांनी सहभाग घेतला. या निविदांमध्ये सर्वात कमी दर 279 रुपये असलेल्या महाराष्ट्र स्टेट को. ऑ. कन्झ्युमर फेडरेशन लिमिटेड, मुंबईया संस्थेला हे काम देण्यात आले, असेही रवींद्र चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

मनसेचा सवाल
दिवाळीला आता काही दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप दिवाळी किटचे वाटप झालेले नाही. त्यामुळे राज्य शासन राज्यातील गरीब जनतेला 100 रुपयांत दिवाळी किट कधी देणार? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. हा निर्णय घेताना सरकारने याच्या निविदा काढून तीन-चार दिवसांत त्याची पूर्तता करणे गरजेचे होते, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले. त्यांनी यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती.