आघाडीच्या उमेदवाराला हलक्यात घेऊ नका

Cabinet Minister Eknath Shinde made an appeal for free chemotherapy
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

आघाडीने दिलेला उमेदवार हा एक बळीचा बकरा असून आपला विजय निश्चित आहे, असे समजणार्‍या शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते आणि ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत. आनंद परांजपे यांना सहज घेऊन आपला विजय नक्की होईल असे गृहीत धरू नका. गाफील राहून चालणार नाही,’ असा सल्लाही यावेळी शिंदे यांनी दिला. शिवसेना व भाजपमध्ये गटबाजीचे वारे जोमाने वाहत असतानाच आता रिपाइंनेसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. याचाच फटका येत्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला पडू शकतो. गणेश नाईक जरी रिंगणात नसले तरी ते अंतर्गत राजकारणातून त्रासदायक ठरू शकतात, याची भीती शिवसेनेला आहे. त्यामुळे गाफील राहू नका, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

शिवसेना-भाजप युती झाल्यापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आनंद परांजपे यांना ठाणे मतदारसंघातून उमेदवारी दिल्यापासून शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेतेमंडळींनी घेतलेल्या बैठकीत यंदाच्या निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार राजन विचारे चार लाखांहून अधिक आघाडी घेऊन विजयी होतील, अशी ‘गर्जना’ केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी रविवारी झालेल्या युतीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना गाफील राहू नका, असा सल्ला देत ही लढाई एकतर्फी होणार नसल्याचे संकेत दिले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्ष असतानाही रिपाइंच्या नेत्यांना डावलण्यात आल्याने पक्षातील कार्यकर्त्यांत नाराजी आहे. व्यासपीठावरही या पक्षाच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे रिपाइंच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मेळाव्याकडे पाठ फिरवली. ‘युतीत आम्हाला योग्य सन्मान दिला जात नाही. त्यामुळे आमच्यासमोर अन्य पर्याय खुले आहेत. आमची शक्ती निवडणुकीत दाखवून दिली जाईल,’ असा इशारा रिपाइंचे नवी मुंबईतील युवा अध्यक्ष यशपाल ओव्हाळ यांनी दिला आहे. या सर्वांची दखल घेऊन शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची कानउघडणी केली आहे.