शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

maharashtra Chief Minister Eknath shinde today Delhi visit meet pm modi and amit shah

मुंबई : शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार घ्यायची नाही, असे मी ठरवूनच पावले उचलत होतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

एकनाथ शिंदे सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. 287पैकी 164 आमदारांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील 99 सदस्यांनी मतदान केले. यावेळी 20 आमदार गैरहजर होते.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यावर विविध पक्षाच्या नेत्यांनी भाषणे केली. त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. शिवसेनेत बंडाचा झंडा का फडकावला, याचे त्यांनी कारण स्पष्ट केले. गेले 20 दिवस 50 आमदार माझ्यावर विश्वास ठेवून आधी सुरत, गुवाहाटी आणि नंतर गोव्याला माझ्याबरोबरफिरत होते. कसलीही चौकशी एकानेही केली नाही. एकीकडे बलाढ्य सरकार, यंत्रणा आणि दुसरीकडे बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचा सैनिक अशी स्थिती होती. हे का झाले, कसे झाले, याच्या मुळाशी जायला पाहिजे होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नाही. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता. विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी काय झाले, ते काही इकडच्या आणि तिकडच्या आमदारांना माहीत आहे. त्यामुळे मी अस्वस्थ होतो. बाळासाहेब नेहमी सांगायचे की, अन्यायाविरोधात बंड असेल उठाव असेल तरी केला पाहिले. माझे फोन फिरू लागले आणि धडाधड लोक जमू लागलो. मंत्रीपद आणि आमदारकी पणाला लावून हे सर्व माझ्यासोबत आले. त्यांचे आभार मानतो. पण शिवसेना वाचवण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही, असा निर्धार केला. तुमचे नुकसान होईल असे जेव्हा वाटेल, तेव्हा तुमचे भविष्य सुरक्षित करून निघून जाईन, असे मी या आमदारांना सांगितले, असे ते म्हणाले.

बंडाची 33 देशांकडून दखल
या सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, यावर विश्वास बसत नाही. एरवी विरोधी पक्षाकडून सत्तेकडे वाटचाल होते. पण आमची सत्तेतून सत्तेकडे होती. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष या सर्व घडोमोडींकेड होते. मला तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समजले की 33 देशांनी दखल घेतली आहे.

बंडखोरांबद्दल हीन भाषेचा वापर
सोशल मीडियावर समोर बसून बोलण्याचे आवाहन केले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र अतिशय वाईट भाषा आमच्याबाबत वापरली जात होती. आमच्यासमवेत महिला आमदारही होत्या, त्यांच्याबद्दल ही हीन भाषेचा वापर करण्यात आला. माझ्या घरावर हल्ला करण्याचे, दगड मारण्याचे आदेश देण्यात आले. पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा अजून जन्माला यायचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.

मुलांच्या आठवणींनी मुख्यमंत्री भावूक
एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाला. ती घटना आणि शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी दिलेले पाठबळ याची आठवण सांगताना एकनाथ शिंदे भावूक झाले. समाजासाठी उभे राहावे लागले, असे आनंद दिघे म्हणाले. त्यानुसार मी पुन्हा उभा राहिलो.

ठाण्यातील शिवसेना जिवंत राहिली
जेव्हा आनंद दिघे यांचे निधन झाले, तेव्हा मी कोलमडून पडेन असे वाटले होते. संतप्त ठाणेकरांनी हॉस्पिटल बेचिराख केले. तो उद्रेक होता. सिलिंडर स्फोटात अनेक लोक मेली असती. मी पोलिसांना सांगितले की, हे सर्व आनंद दिघे यांच्या प्रेमापोटी होत आहे. अनेक शिवसैनिकांवर केसेस झाल्या. तेव्हा ठाण्यातली शिवसेना संपेल असे वाटले होते. शिवसेनाप्रमुखही तेव्हा चिंतेत होते. मात्र या सर्वांना बाहेर काढेपर्यंत मी झोपलो नाही. ठाण्यातील शिवसेना जिवंत ठेवली, असे ते म्हणाले.

मला संपविण्याचा डाव
ठाण्यात लेडिज बार जोरात सुरू होते. त्याबद्दल मी पोलिसांना अर्ज लिहून थकलो. सोळा लेडीज बार तोडले, माझ्यावर शंभरपेक्षा जास्त खटले आहेत. पण मी ते बंद करून टाकले. कोर्टात माझ्यावर पिटीशन देखील फाईल झाले. त्यावेळी मुंबईत गँगवार सुरू होते, मला संपवण्याचा बारवाल्या शेट्टी लॉबीचा प्लान होता. मी आनंद दिघे यांना सांगितले. दिघे साहेबांनी शेट्टी लोकांना बोलवले आणि एकनाथला काही झाले तर याद राखा, असे सुनावले. कुठल्याही आंदोलनात मी मागे पाहिलं नाही. माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी परिणामांचा विचार कधीच केला नाही, असे ते म्हणाले.