Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र बापूसाहेब गोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; दाजी शिंदेंचा मेव्हणे चिखलीकरांना धक्का

बापूसाहेब गोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; दाजी शिंदेंचा मेव्हणे चिखलीकरांना धक्का

Related Story

- Advertisement -

राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांची ही घरवापसी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून नव्हे, तर शेकापचे आमदार तथा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे भावजी श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नाने झाली.

बापूसाहेब गोरठेकरांना भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करायला लावून शिंदे यांनी मेहुण्याला धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गोरठेकर यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणलं होतं. गोरठेकर यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या विरोधात भोकरमधून उमेदवारी दिली होती. मात्र, गोरठेकर यांचा पराभव झाल्याने अशोक चव्हाण यांना शह देण्याचा चिखलीकर यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर गोरठेकर अडगळीत पडल्याचं चित्र होतं. दरम्यान, गुरुवारी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

वयाची सत्तरी ओलांडलेले गोरठेकर २००४ ते २००९ दरम्यान ‘राष्ट्रवादी’चे आमदार होते. नंतर २००९ ते २०१९ पर्यंत या पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष होते आणि उमरी आणि धर्माबाद या दोन तालुक्यांत त्यांचे जबरदस्त राजकीय वर्चस्वही होते. आपलं संपूर्ण राजकीय जीवन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काढलेल्या गोरठेकरांचं भाजपमध्ये फारकाळ मन रमलं नाही. त्यांची ही अवस्था हेरून त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. एकेकाळी शरद पवार यांचे विश्वासू अशी गोरठेकर यांची ओळख होती. मात्र, निवडणुकीत भाजपशी घरोबा केलेल्या गोरठेकरांना भाजपचे खासदार चिखलीकर यांचे दाजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर नेऊन सोडण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मेव्हणे आणि दाजी यांच्यामधील राजकीय दरी आणखी वाढणार असे दिसते.

 

- Advertisement -