घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखळबळजनक! कपडे धुण्याच्या सोड्यापासून दूधनिर्मिती; पोलिसांचे वेशांतर करून मारला छापा

खळबळजनक! कपडे धुण्याच्या सोड्यापासून दूधनिर्मिती; पोलिसांचे वेशांतर करून मारला छापा

Subscribe

नाशिक : कपडे धुण्याचा सोडा व आरोग्यास घातक रासायनिक पावडरच्या सहाय्याने भेसळयुक्त दूध बनवणार्‍या डेअरीचा शनिवारी (ता. २) नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करत पर्दाफाश केला. पथकाने मिरगाव (ता. सिन्नर) शिवारात छापा टाकत गोडाऊनमधून तब्बल ११ लाख रुपयांचा ३०० गोणी मिल्क पावडर व सात गोणी कॉस्टिक सोडा जप्त केला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरगाव येथील दूध संकलन केंद्रात भेसळयुक्त दूध बनविणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांना सूचित करीत पाटील यांनी गुन्हे शाखेच्या विशेष पथकामार्फत सापळा रचून हे रॅकेट उद्ध्वस्त केले. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी येथील ओम सदगुरू दूध संकलन केंद्रात मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध तयार करण्यात येत होते. डेअरी चालक संतोष विठ्ठल हिंगे, प्रकाश विठ्ठल हिंगे (दोघे रा. मिरगाव) यांना पकडण्यात आले.

- Advertisement -

या ठिकाणी झडती घेतल्यावर मिल्की मिस्ट नावाची रासायनिक पावडर व कपडे धुण्यासाठी वापरला जाणारा कॉस्टिक सोडा आढळून आला. हिंगे बंधूंच्या घरझडतीमध्ये रसायनांचा साठा लपवून ठेवला असल्याचे उघड झाले. डेअरीत रसायनांचा पुरवठा करणार्‍या हेमंत श्रीहरी पवार (रा. उजनी) याच्या घरी छापा टाकत पथकाने तेथील गोडाऊनमधून ११ लाख रुपयांचा ३०० गोणी मिल्क पावडर व सात गोणी कॉस्टिक सोडा जप्त केला. हेमंत पवार हा दूध भेसळीच्या व्यवसायात कुप्रसिद्ध असून, त्याच्यावर यापूर्वीही कारवाया झाल्या आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त लोहकरे यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. त्यानंतर वरील तिघांविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

पोलिसांचे वेशांतर

शनिवारी पहाटे पाचपासूनच पथकाने डेअरी परिसरात वेशांतर करून सापळा रचला होता. सकाळी नियमित दूध संकलन आटोपल्यावर दोघे हिंगे बंधू प्लास्टिकच्या दोन कॅनमध्ये काही मिश्रण घेऊन आले. डेअरीत पोहोचल्यावर पथकाने छापा टाकला, तेव्हा संकलित केलेल्या दुधात ते पांढर्‍या रंगाचा द्रवरूप पदार्थ मिश्रित करीत होते. मिल्क पावडर आणि कास्टिक सोडा एकत्र करून बनवलेले हे मिश्रण होते.

- Advertisement -

हेमंत पवारचे नगर, नाशिकमध्ये जाळे

हेमंत पवार हा दूध भेसळीच्या व्यवसायात प्रसिद्ध आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांत त्याचे नेटवर्क असून, डेअरी चालकांना मिल्क पावडर, कास्टिक सोडा, आरोग्यास घातक असलेल्या रसायनांचा तो पुरवठा करतो. वर्षभरापूर्वी पाथरे येथे दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यातही केमिकल सप्लायर म्हणून हेमंत पवार याचे नाव पुढे आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -