घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखळबळजनक! डॉक्टर गायब; नर्सच्या पतीने केला उपचार

खळबळजनक! डॉक्टर गायब; नर्सच्या पतीने केला उपचार

Subscribe

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर बाहेरगावी अन् नर्स गायब असताना बनियनवर हजर असलेल्या नर्सच्या पतीकडून रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत दररोज कितीही मोठमोठे दावे करत असले तरी वास्तव वेगळेच असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. 15 मे) इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथे तीन तरुणांच्या दुचाकीला रात्री 8 च्या सुमारास अपघात झाला होता. अपघातात प्रकाश पादीर, योगेश पुजारा, कुडलीक पादिर तरुण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता याठिकाणी एकही कर्मचारी हजर नसल्याचे समोर आले. आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करणारे डॉ. लचके बाहेरगावी गेले असल्याचे तर नर्स गायब असल्याचे समोर आलेे. याबाबत रुग्णांनी विचारणा केली असता केंद्रात फक्त नर्सचा पती बनियनवर उपस्थित होता. अखेर नर्सच्या पतीने जखमी तरुणांवर उपचार करण्यास सुरुवात केली. मलमपट्टी करुन झाल्यावर नर्स आरोग्य केंद्रात आली. डॉ. लचके बाहेरगावी तर नर्स गायब अन उपचारासाठी बनियनवर नर्सचा पती हजर असा प्रकार समोर आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडून शासनाची अन रुग्णांची फसवणूक करण्यात येत आहे. मुख्यालयी न राहणार्‍या डॉक्टर अन कर्मचार्‍यांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे.

घटनेसंदर्भात तालुका आरोग्य अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रावर विभागाकडून चौकशीसाठी विशेष पथक पाठविण्यात येईल. शासनाची अन् रुग्णांची फसवणूक करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.: डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा आरोग्य अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -