Exclusive : सिव्हिलच्या प्रवेशव्दारावर स्ट्रेचरसाठी अर्धा तास याचना; रुग्णाचा मृत्यू

सुशांत किर्वे । नाशिक

गोरगरीबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांचा कोणीही वाली नसल्याचे संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ रिक्षात आणलेल्या वयोवृद्ध रुग्णाला दाखल करण्यासाठी स्ट्रेचर आणि कर्मचारीच नसल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता घडला. रुग्णाच्या पत्नी व मुलीने मदतीसाठी कोणी येत नसल्याने हांबरडा फोडला. बघ्यांची गर्दी वाढू लागल्याने अर्ध्या तासानंतर कर्मचार्‍याने कसेबसे स्ट्रेचर आणत अपघात विभागात नेले. तोपर्यंत रुग्णाचे प्राण गेले होते. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले.

कॅन्सरग्रस्त असलेला ६० वर्षीय रुग्ण जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाला होता. त्या रुग्णास रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, रुग्णाची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी त्याची पत्नी व मुलीने रिक्षाने जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ आणले. रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्यांना काय करावे ते सूचत नव्हते. मुलीने पाण्याची बाटली पिशवीतून बाहेर काढत वडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पण, वडील प्रतिसाद नव्हते. त्यांची अवस्था पाहून मायलेकींनी हांबरडा फोडला. त्यांना प्रवेशव्दाराजवळ कर्मचारी व परिचारिका दिसत नसल्याने त्या सुरक्षारक्षकाकडे स्ट्रेचरसाठी याचना करू लागल्या. पण, ते आपले काम नसल्याने त्याने दुर्लक्ष केले. मायलेकींचे रडणे पाहून बघ्यांची गर्दी वाढू लागली. तरीही, रुग्णालयातील एकही कर्मचारी प्रवेशव्दाराजवळ आला नाही. तितक्यात एक कर्मचारी विनास्ट्रेचर आला. अपघात विभागाबाहेर एकही स्ट्रेचर नसल्याचे तो इतरांना सांगू लागला. गर्दी वाढू लागल्याने त्या कर्मचार्‍याने कसेबसे दुसर्‍या कक्षातून स्ट्रेचर आणत रुणास अपघात विभागात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. वयोवृद्ध रुग्णास वेळीच स्ट्रेचर मिळाले असते तर प्राण वाचले असते, अशी चर्चा इतर रुग्ण व नातेवाईकांमध्ये सुरु होती.

‘माय महानगर’चे सिव्हिल सर्जनला प्रश्न

सिव्हिलच्या अनागोंदी कारभारावर ‘माय महानगर’ वारंवार वाचा फोडत असते. तरीही निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग येत नाही. सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात हे देखील प्रत्येक वेळी ‘कातडी बचाव’ भूमिकेत असतात. त्यांनी सिव्हिलची जबाबदारी घेतल्यापासून चांगले असे काही झाले नाहीच; शिवाय होती ती व्यवस्थाही बिघडली आहे. या पार्श्वभूमीवर ‘माय महानगर’ने उपस्थित केलेले काही प्रश्न.. यांची उत्तरे प्रशासन देणार का?

  • साधनसामुग्रीवर कोट्यवधी खर्च होत असताना त्याचा वापर अशा मोक्याच्या क्षणी का होत नाही?
  • सिव्हिलच्या प्रवेशव्दारावर रुग्णाचे नातेवाईक स्ट्रेचरसाठी ओरडून याचना करीत असतांना, त्यांचा आवाज व्यवस्थेतील कुणाही पर्यंत का जाऊ नये?
  • सिव्हिल प्रशासन इतके बहिरे झाले का?
  • या बहिरेपणावर कधी शस्त्रक्रिया होईल?
  • सिव्हिल सर्जन यांचा कक्ष प्रवेशव्दारापासून अवघ्या १५० फुटांवर असतांना त्याची भीती संबंधित कर्मचार्‍यांना का नाही?
  • सिव्हिल सर्जन व्यवस्थेची शस्त्रक्रिया कधी करणार?
  • अशा शस्त्रक्रियेची त्यांची तयारी नसेल तर नाशिकमध्ये काम करण्याचा त्यांचा आग्रह कशासाठी?
  • सिव्हिलमधील क्लोज सर्किट कॅमेर्‍यांत ही घटना कॅच झाली असल्यामुळे दोषींवर आता तरी कारवाई होणार का?

 

रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजावळ स्ट्रेचर ठेवलेले आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णाच्यावेळी स्ट्रेचर का नव्हता, याबाबत माहिती नाही. याप्रकरणाची चौकशी केली जाईल. : डॉ. अशोक थोरात, सिव्हिल सर्जन