घरमहाराष्ट्रनाशिकExlusive : सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी स्वखर्चातून आणले नाक्यावरचे मजूर

Exlusive : सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी स्वखर्चातून आणले नाक्यावरचे मजूर

Subscribe

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवाळीसारखी साफसफाई सुरू आहे. एरव्ही स्वच्छतेबाबत अनास्था असलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण रुग्णालयाचा कोपर न् कोपरा टीपटॉप करून घेतलाय. विशेष म्हणजे स्वतःच्या खिशातून कधी दमडीही न काढणार्‍या वरिष्ठांनी नाका मजूरांना खिशातून प्रत्येकी ४०० रुपये देऊन त्यांच्याकडून साफसफाई करुन घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आरोग्य विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अचानक होणार्‍या दौर्‍याची जिल्हा रुग्णालय प्रशासनाने एवढी धास्ती घेतली आहे की, प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी आपापली कामे कधी नव्हे ते चोख बजावताना दिसत आहेत. मुंढे यांच्या कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. नाशिक महापालिका आयुक्तपदी असताना त्यांची वादळी कारकीर्द नाशिककरांनी जवळून अनुभवली आहे.

- Advertisement -

मुंढे प्रथमच नाशिक दौर्‍यावर येण्याच्या शक्यतेने जिल्हा रुग्णालय प्रशासन चांगलेच धास्तावले आहे. त्यातच जिल्हा रुग्णालयात साफसफाईसाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी, कंत्राटी कामगार व ऑटोमॅटिक मशीन असूनही स्वच्छतेसाठी बाहेरून रोजंदारी कर्मचारी आयात करण्याची वेळ सिव्हिलवर आली. शहरातील भद्रकाली परिसरातील नाक्यावरून किमान ६ ते ७ कामगार साफसफाईसाठी आणण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी स्वतःच्या खिशातून प्रत्येकी ४०० रुपये दिल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

सैंदाणे प्रकरणामुळे अधिक धास्ती

शासकीय नोकरीतील बदलीसाठी खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात सध्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालय राज्यभर प्रकाशझोतात आलेले आहे. त्यामुळे एकूणच जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. त्यामुळे आपला कारभार अधिक स्वच्छ व उजळ दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय.

- Advertisement -
मुंढे आलेच नाहीत, पण कधीही धडकू शकतात

खरेतर आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान कधीही जिल्ह्याला अचानक भेट देण्याची शक्यता होती. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. रविवारी (दि.२०) सायंकाळपर्यंत तरी मुंढे जिल्ह्यात आलेले नव्हते. परंतु, त्यामुळे तरीही सिव्हिलची धास्ती कमी झालेली नाही. ते अचानक कधीही, कुठल्याही आरोग्य केंद्र किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देऊ शकतात. अशापद्धतीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या धाकाने का होईना, आरोग्य यंत्रणा कामाला लागल्याने सर्वसामान्य जनतेत मात्र आनंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -