घरताज्या घडामोडीदुकानांच्या वेळा सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाढवा

दुकानांच्या वेळा सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाढवा

Subscribe

शासनाने निर्णयाचा विचार करून व्यापार्‍यांना दिलासा देण्याची मागणी

कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येऊनही दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेच्या निर्बंधाबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत बाजारपेठेमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी होत असल्याने दुपारी ४ ऐवजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी , तसेच शनिवारचा विकेंड लॉकडाऊन रदद करण्याची मागणी देखील नाशिकच्या व्यापार्‍यांनी केली आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बाजारपेठा सुरू करतांना वेळेचे निर्बंध टाकण्यात आले. त्यानूसार सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली तर शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने मात्र बंद ठेवण्यात येत आहे.

नाशिकचा विचार करता जिल्हयातील कोरोना रूग्णसंख्या ४८ हजारांहून सतराशे पर्यंत खाली आली आहे. यापूर्वी सरकारने लागू केलेल्या टप्प्यांनूसार ज्या शहरांतील रूग्णसंख्या कमी असेल त्या शहरातील व्यवसाय पुर्ववत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र पुन्हा हे आदेश मागे घेत संपूर्ण राज्यात दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता या विरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गेल्या दिड वर्षांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आता रूग्णसंख्या कमी झाली असतांनाही शासनाने निर्बंध कायम ठेवल्याने हे निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत शासनाने पूर्नविचार करून व्यापार्‍यांना दिलासा देण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.

- Advertisement -

वीकेंड लॉकडाऊनला विरोध
शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊनला सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतात. मात्र लॉकडाऊन असले तरी, नागरिक मात्र मोठया प्रमाणावर घराबाहेर पडत असल्याने मग व्यापार्‍यांवरच अन्याय का असा सवालही व्यापार्‍यांनी उपस्थित केला आहे. शनिवार आणि रविवार विविध कंपन्या, आस्थापनांना सुटी असते परंतु लॉकडाऊनमुळे नोकरदार वर्ग खरेदीसाठी बाहेर पडू शकत नाही. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना शनिवारी सुटी असल्याने या नागरिकांच्या सोयीसाठी शनिवारचा लॉकडाऊन रदद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

- Advertisement -

गेल्या तीन ते चार महिन्यांत रूग्णसंख्या वाढत असतांना व्यापारी संघटनांनी सरकारला नेहमीच सहकार्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे आता सरकारने देखील व्यापार्‍यांचा विचार करायला हवा. पूर्ण लॉकडाउन करणे आता राज्यातील व्यापारयांच्या हिताचे नाही. याउलट शिथिलता देतांना नियमांचे तंतोतंत पालन कसे होईल यावर विशेष लक्ष केंद्रित करून संपूर्ण व्यवहार सुरू करणे आवश्यक आहे. वीकेंड लॉकडाऊन हा एक दिवसांचाच असावा.
– संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ असोसिएशन

 

व्यापारी वर्गाला आता पूर्ण लॉकडाऊन परवडणारा नाही. सरकारने सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दुकानदारांनाही आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत दूकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. कारण सकाळी ७ ते ४ या वेळेत बाजारपेठेत मोठी गर्दी होते वेळ वाढवल्यास या गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.
– प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, धान्य किराणा असोसिएशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -