घरमहाराष्ट्रशेतकरी संप चिघळला, भाजीपाला, दूधाची आवक घटणार

शेतकरी संप चिघळला, भाजीपाला, दूधाची आवक घटणार

Subscribe

किसान क्रांती जनआंदोलन समितीने राज्यभर पुकारलेला शेतकरी संप आज चौथ्या दिवशीही सुरू आहे. १ जूनपासून शेतकऱ्यांच्या संपाला सुरूवात झाली असून १० जूनपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. ७ तारखेपासून हा संप आणखीन तीव्र होणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

शेतमालाला हमीभाव, दुधाला योग्य दर मिळावा

शेतीमाल आणि दुधाला योग्य भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. ५ जूननंतर हा संप आणखी तीव्र केला जाणार आहे. ६ व ७ जूनला शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना भाजीपाला पाठवणार नाही. त्यामुळे राज्यात बाजार समित्या बंदच ठेवल्या जाणार असल्याची माहिती किसान क्रांती जनआंदोलनाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी काल दिली.

- Advertisement -
प्रातिनिधीक चित्र

मुंबईसह इतर शहरांवर संपाचा परिणाम

काल नाशिक-पुणे महामार्गावर दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाट्यावर हे आंदोलन करण्यात आलं. संपाच्या १० दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नसल्याचा दावा किसान सभेच्या वतीने करण्यात आला आहे. याचाच परिणाम मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अनेक शहरांमधील बाजारांवर झाला आहे.

महाराष्ट्रासह देशभर आंदोलनं झाली

किसान क्रांती जनआंदोलनाच्या कोअर कमिटीचे सदस्य अॅड. कमला सावंत, विजय काकडे यांनी काल नगर येथे पत्रकार परिषद घेऊन संप तीव्र करण्याचा इशार दिला.

“किसान क्रांती जनआंदोलन आता केवळ महाराष्ट्रात होत नाही. मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाबसह बावीस राज्यांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याने आता हे आंदोलन देशभर झाले आहे. महाराष्ट्रात ५ जूनपासून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. मागील तीन दिवस संप तीव्र करण्यात आलेला नव्हता. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ही रणनीती आखण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारला सकारत्मक विचार करावा लागणार आहे”, असे अॅड. सावंत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण

गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील पुणतांब्यातून सुरुवात झालेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी, १ जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीही संप केला होता. त्यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा, या मागण्यांचा समावेश होता.

प्रातिनिधीक चित्र

किसान सभेच्या आंदोलनाला यश

याच वर्षाच्या सुरूवातीला विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च मुंबई धडकला होता. नाशिकहून सहा दिवसांचा पायी प्रवास करून १२ मार्च रोजी आंदोलन शेतकरी आझाद मैदानावर दाखल झाले. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेनेसह बहुतांश राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते.

शरद पवारांची सरकारवर बोचरी टीका

राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सरकारची आश्वासन पाळण्याची नियत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

“”एक शेतकरी म्हणून माझा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. मात्र सामान्य माणसाला त्रास होईल, लोकांवर आघात होईल, असं काही करु नये. पण हा संघर्ष प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, हा निकाल घ्यावा लागेल. सरकारने दिलेली आश्वासन पाळली नाहीत, तशी त्यांची नियत दिसत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी. माझी विनंती आहे, आंदोलनात रस्त्यावर दूध ओतणं टाळावं. आक्रोश दाखवायचा असेल तर दूध गरीब मोहल्ल्यात वाटप करावं. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही. त्याउलट गरिबांची सहानभूती मिळेल”
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

समाजाने शेतकरी संपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -