घरमहाराष्ट्रनागपूरसमृद्धी महामार्गामुळे भाग्यरेषा बदललेल्या शेतकऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

समृद्धी महामार्गामुळे भाग्यरेषा बदललेल्या शेतकऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Subscribe

नागपूर : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्यांची भाग्यरेषा बदलली आशा काही शेतकऱ्यांना सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘रामगिरी’वर खास स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी या शेतकरी बांधवांनी समृद्धी महामार्ग तयार करून आयुष्यात समृद्धी आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य शासनाचे आभार मानले. तसेच या महामार्गामुळे भविष्याची तरतूद करून आयुष्य समृद्ध झाल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आता या रस्त्याचा वापर लोक करू लागली आहेत. असे असले तरी समृद्धी महामार्गाची घोषणा झाली, त्यावेळी अनेक जिल्ह्यांमधून त्याला प्रखर विरोध झाला होता. मात्र त्या परिस्थितीतही बदलत्या काळाची पावले ओळखून काही शेतकऱ्यांनी आपली जमीन या महामार्गासाठी देण्याची तयारी दर्शवली. अशा 9 गावांतील सरपंच आणि शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी खास आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधून या महामार्गाचा त्यांना नक्की कसा फायदा झाला ते त्यांच्याच तोंडून जाणून घेतले.

- Advertisement -

या शेतकऱ्यांनी सगळ्यात आधी समृद्धी महामार्ग तयार केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. तसेच आता गावातून मोठ्या शहरात जाणे अधिक सोपे झाले असल्याचे सांगितले. समृद्धी महामार्गासाठी जमीन देऊन आमच्या आयुष्यात दुप्पट समृद्धी आली असल्याचे या शेतकऱ्यांनी मान्य केले. तसेच यातील काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी देऊ केलेल्या जमिनीच्या दुप्पट शेती घेऊन आपले उत्पन्न दुप्पट केल्याचे सांगितले. यातील एका शेतकऱ्याने आपण चार एकर शेती समृद्धीसाठी देऊन त्याबदल्यात वीस एकर शेती, घर, गाडी घेतली तसेच वार्षिक उत्पन्न देखील कैक पटीने वाढले असल्याचे मुखमंत्र्यांना सांगितले.

तर काहींनी, यापूर्वी आम्ही अल्पभूधारक शेतकरी होतो मात्र समृद्धी महामार्गाच्या आलेल्या पैशातून जास्त शेती घेतली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आमचे आयुष्य गोड केल्यामुळे आम्हाला त्यांचे तोंड गोड करण्याची इच्छा असल्याचे या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या शेतकऱ्यांना गोड पदार्थ भरवून तुम्हा सर्वांचे आयुष्य आगामी काळात अधिक समृद्ध व्हावे, असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पनाच शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणे ही होती. मात्र या जमिनीचा मोबदला देताना त्याचा शेतकऱ्यांनी योग्य विनियोग करावा आणि सगळे पैसे एकत्र खर्च करून टाकू नयेत, अशी इच्छा होती. त्यामुळेच शेतकऱ्यांचे त्यावेळी सरकारच्या वतीने समुपदेशन देखील करण्यात आले होते. मात्र आज या शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेतल्यावर त्यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आलेल्या पैशाचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करून आपल्यासह आपल्या कुटुंबाच्या सर्वांगिण समृद्धीची तरतूद केली असल्याचे दिसल्याचे सांगून त्याबद्दल समाधान व्यक्त केले. ही फक्त सुरुवात असून समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा जी नवनगरे वसणार आहेत त्यामाध्यमातून या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून बदल घडेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आणि नऊ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -