जोगेश्वरीतील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, अग्नीशमन दलाच्या १० गाड्या रवाना

andheri lokhandwala complex massive fire 10 injured

मुंबई – जोगेश्वरी (पश्चिम) येथील फर्निचर मार्केटमध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत फर्निचर गोदामे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र फर्निचर मालकांचे लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी (पश्चिम), रिलीफ रोड, घास कंपाऊंड, पेट्रोल पंपासमोरील फर्निचर मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असतानाच सकाळी ११ वाजताच्या सुमारास फर्निचरच्या एका गोदामात आग लागल्याचे समजते. मार्केट फर्निचरचे असल्याने व ते फर्निचर ज्वलनशील असल्याने आग भडकली. आगीच्या घटनेमुळे फर्निचर मार्केटमध्ये खळबळ उडाली व धावपळ झाली. आगीच्या भितीने बिथरलेल्या फर्निचर गोदाम, दुकानांच्या मालकांनी व कामगारांनी आपला जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मात्र आगीची भयानकता पाहता अग्निशमन दलाने आग स्तर -३ ची असल्याचे सकाळी ११.२१ वाजताच्या सुमारास जाहीर केली. तसेच, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने आणखीन कुमक मागवली. अग्निशमन दलाने १० फायर इंजिन व ६ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर दुपारी उशिराने नियंत्रण मिळविले. अंतिम वृत्त हाती येईपर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही आग का व कशी काय लागली याबाबत पालिका, अग्निशमन दल व पोलीस दलाचे संबंधित अधिकारी तपास करीत असल्याचे समजते.

बेस्टची बस वाहतूक वळवली

जोगेश्वरी येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याने रिलीफ रोड येथून बेस्ट परिवहन विभागाच्या बस गाड्यांची होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. यामध्ये, बस मार्ग क्रमांक ४, २०२, २०३, २९० व ३५९ सकाळी ११.३० वाजल्यापासून दोन्ही दिशेत बेहराम बाग, लिंक रोड मार्गे परावर्तित करण्यात आले.