महाविकास आघाडीची पहिली एकत्रित सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनामध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महविकास आघाडीच्या आमदारांची महत्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यभरात महाविकास आघाडीची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

first joint meeting of the Mahavikas Aghadi in Chhatrapati Sambhajinagar

विधानभवनात आज (ता. ०८ मार्च) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडी पक्षाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते. येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यभरात महाविकास आघाडीकडून एकत्रित सभा घेण्यात येणार आहेत. परंतु त्याआधी या सभांचे नियोजन करण्यासाठी १५ मार्च या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाविकास आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी काळात शिंदे-फडणवीस सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच आक्रमकपणे भूमिका मांडण्यासाठी या संयुक्त सभा घेण्यात येणार येणार आहेत. या सभांची सुरुवात २ एप्रिल पासून छत्रपती संभाजीनगर येथून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच या सभांना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीची पहिली सभा ही २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर १६ एप्रिलला नागपूर येथे दुसरी सभा, १ मे ला मुंबईत तिसरी सभा, १४ मेला पुण्यात चौथी सभा, कोल्हापूरला २८ मेला पाचवी सभा, नाशिकमध्ये ३ जूनला सहावी सभा आणि सातवी सभा अमरावती येथे घेणयात येणार आहे.

हेही वाचा – आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा; तत्काळ जामीन मंजूर

दरम्यान, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर शनिवारी (ता. ४ मार्च) ठाकरे गटाकडून पहिली जाहीर सभा खेड येथे घेण्यात आली. या सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या सभेला झालेली गर्दी पाहता अशाच काही सभा महाविकास आघाडीने एकत्रित घ्याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, महाविकास आघाडीकडून घेण्यात येणाऱ्या सभा या महत्वपूर्ण ठरू शकतात, असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या या सभांमधून महाविकास आघाडीचे नेते नेमके काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.