हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, कोल्हापुरात समर्थक आक्रमक

ED raids Hasan Mushrif's house in Kagal

कोल्हापूर : गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना उभारणीत सुमारे 40 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांच्यावर कागल तालुक्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर तसेच पुण्यातील घर, कार्यालय, साखर कारखाना, मुलींचे निवासस्थान अशा सात ठिकाणी गेल्या महिन्यात सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागाने (आयटी) छापेमारी केली होती. त्यावेळी मुश्रीफ यांच्या घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या छापेमारीमुळे मुश्रीफ यांच्या संतप्त कार्यकर्त्यानी कागल बंदची हाक दिली होती.

आधी नवाब मलिक आणि आता माझ्यावर ईडीने धाडी घातल्या आहेत. किरीट सोमय्या आता अस्लम शेख यांचे नाव घेत आहेत. त्यामुळे विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे की काय, अशी शंका निर्माण होत असल्याचे मुश्रीफ त्यावेळी म्हणाले होते.

आता कथित फसवणुकीप्रकरणी मुरगूड पोलिसांत काल, शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याने येथील वातावरण तापत चालल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. मुश्रीफ यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार देणाऱ्या विवेक कुलकर्णीसह इतरांवरही मुश्रीफ समर्थकांकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरगूड पोलीस ठाण्यासमोर मुश्रीफ समर्थकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली.

2012मध्ये हा कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन मुश्रीफ केले होते. त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले व सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कारखान्यातील 98 टक्के पैसा हा मनी लाँडरिंगच्या माध्यमातून जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्यात मुश्रीफांचे जावई मतीन मंगोली यांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. हा कारखाना काही वर्षांपूर्वी ब्रिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला होता. ब्रिस्क इंडिया ही कंपनी जावई मंगोलींच्या मालकीची आहे. व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार केली आहेत. या बोगस खात्यांमध्ये टाकलेले पैसे ब्रिस्क इंडिया कंपनीत वळवल्याचा आरोप करण्यात आला होता.