घरक्राइमसरकारची सव्वा कोटींना फसवणूक

सरकारची सव्वा कोटींना फसवणूक

Subscribe

सहा ठेकेदारांवर गुन्हा दाखल

शहापूर । सन 2016 ते 2018 दरम्यान सरकारच्या विविध योजनेंतर्गत करण्यात आलेल्या 20 कामांची देयके मिळविण्यासाठी ठेकेदारांनी सरकारची तब्बल सव्वा कोटीची फसवणूक केली आहे. या देयकांसाठी बनावट चाचणी अहवाल सादर करून तब्बल एक कोटी 19 लाखाचा अपहार करणार्‍या सहा ठेकेदारांवर शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील 2016 ते 2018 दरम्यान शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व देखभाल दुरुस्ती निधी या योजनांमधून संबंधित ठेकेदारांना तालुक्यातील एकूण वीस गावांमध्ये साधी विहीर बांधणे व दुरुस्ती करणे अशी कामे देण्यात आली होती. या कामांची एक कोटी 19 लाखांची देयके प्राप्त करण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी 2017 मध्ये शासकीय तंत्र निकेतन बांद्रा, मुंबई येथील त्रयस्थ चाचणी अहवाल शासनास सादर केला होता.

- Advertisement -

शासनाने या अहवालाची पडताळणी केली असता शासकीय तंत्र निकेतन बांद्रा मुंबई यांनी सन 2015 पासून त्रयस्थ चाचणी अहवाल देणे बंद केले असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील 20 कामांचे देयक मिळविण्यासाठी ठेकेदारांनी बनावट चाचणी अहवाल सादर करून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या प्रकरणी गणेश कृपा कन्स्ट्रक्शन (मुरबाड), बुधरानी धर्मु इंदनदास (उल्हासनगर), तालुक्यातील अघई ग्रामपंचायतीचे सरपंच व अन्य तीन अशा सहा ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 2017 ला सादर करण्यात आलेल्या चाचणी अहवालाची पडताळणी करण्यास व गुन्हा दाखल करण्यास लागलेला विलंब पाहता ठाणे जिल्हा परिषद व शहापूर पंचायत समितीच्या वर्तुळात याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -