घरताज्या घडामोडीराज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र चेंबर नाशिक शाखेचा सुवर्ण महोत्सव

राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र चेंबर नाशिक शाखेचा सुवर्ण महोत्सव

Subscribe

शनिवारी आयोजित सोहळयात राज्याच्या औद्योगिक विकासाचा आराखडा मांडणार

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष यंदा साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने नाशिक येथे ९ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त औद्योगिक तसेच कृषी, सेवा, पर्यटन आदी क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढावी, रोजगार निर्माण होऊन राज्याचा विकास व्हावा यादृष्टीने राज्याच्या विकासाचा आराखडाही सादर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

चेंबरच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना अध्यक्ष ललित गांधी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. ८ व ९ एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ८ एप्रिल रोजी चेंबरच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्याच्या विकासाच्यादृष्टीने चेंबरचा सहभाग याविषयावर चर्चा करण्यात येणार आहे. शनिवार (दि. ९) रोजी कालिदास कला मंदिर येथे सकाळी ११ वाजता आयोजीत मुख्य कार्यक्रमप्रसंगी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री दादा भुसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यातील व्यापार व उद्योगात वाढ व्हावी, नवउद्योजक तयार व्हावेत आणि तरुणांनी नोकरीवर विसंबून न राहता उद्योजक होऊन रोजगारनिर्मिती करावी यासाठी महाराष्ट्र चेंबरकडून सातत्याने प्रयत्न होत असतात. नाशिक शाखेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असतांना राज्याच्या उद्योग, व्यापार, सेवा, कृषी, पर्यटन, माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठीही चेंबरचे विशेष प्रयत्न राहणार आहेत. याकरीता चेंबरने या प्रमुख क्षेत्रांवर धोरण निश्चित करून त्याबाबतचा आराखडा शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘उत्तर महाराष्ट्र विकास परिषद’ तसेच ‘महाराष्ट्र स्कील समिट’ चे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात विविध क्षेत्रात असलेल्या गुंतवणुक विकास पायाभुत सुविधा, उद्योग, आयटी, कृषीमाल प्रक्रिया, क्लस्टर डेव्हलपमेंट अशा विविध विषयांवर या परिषदेत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उद्योगांना अपेक्षित असे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठस्तरावर अभ्यासक्रमात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे गांधी यांनी सांगितले. गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर असलेले आपले राज्य गेल्या काही वर्षांपासून सहाव्या सातव्या क्रमांकावर आले आहे. अर्थात कोविडच्या संकटामुळे काही अडचणी आल्या परंतू इतर राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात वीजेचे दर प्रती युनिट ३ रूपयांनी अधिक आहेत. आज उद्योगांना जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे उद्योगांना असलेल्या अडचणी त्यावरील निराकरण आणि राज्यातील गुंतवणुक वाढीसाठी सरकारकडून असलेल्या अपेक्षा यासंदर्भात कृती आराखडा शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, सुवर्ण महोत्सव नियोजन समितीचे विजय बेदमुथा, संजय सोनवणे, नाशिक शाखेच्या अध्यक्षा सुनिता फाल्गुणे, उमेश वानखेडे, नेहा खरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चेंबरच्यावतीने क्लस्टरची निर्मिती
राज्यात व्यापार, उद्योग वाढीसाठी प्रयत्न करत असतांना महाराष्ट्र चेंबरच्यावतीने राज्याच्या विविध भागात क्लस्टरची निर्मिती करण्यात येत आहे. यात नाशिकमध्ये महिला उद्योजका विकास, सिंधुदुर्ग येथे कृषीप्रक्रिया क्लस्टर, इंजिनिअरींग क्लस्टर आदी क्लस्टरची निर्मिती करण्यात येऊन नवउद्योजकांना याव्दारे संधी निर्माण करण्यात येणार आहे. पुढील सहा वर्षात टप्प्याटप्प्याने हे क्लस्टर विकसित करण्यात येणार असल्याचे यावेळी चेंबरच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

यांचा होणार सन्मान
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी ज्या व्यक्ती, संस्था यांनी भरीव योगदान दिले अशा संस्थांच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यात एचएएल, महिंद्रा अँड महिंद्रा, जैन इरिगेशन -जळगाव, दादासाहेब रावल गु्रप ऑफ इंडस्ट्री – धुळे, शिरपूर एज्युकेशन सोसायटी -धुळे, मालपाणी ग्रुप – संगमनेर, सहयाद्री फार्म, बेदमुथा इंडस्ट्री, महाराष्ट्र सलवंत एक्सट्रेशन – धुळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -