घरताज्या घडामोडीनाशिककर हसले; पुणेकर रुसले

नाशिककर हसले; पुणेकर रुसले

Subscribe

पुणे महाराष्ट्रात नसून परक्या राज्यात असल्या सारखी वागणूक देत असल्याचा घणाघाती आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपची अध्यक्ष हर्षा शहा यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व रेल्वे प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता अखेर १७४ दिवसांनी मनमाड-नाशिक-मुंबई ही उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी पंचवटी एक्स्प्रेस धावायला लागली आहे. त्यामुळे ही ट्रेन सुरू झाल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, पुणेकरांनी यावरून नाराजी व्यक्त करत कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबरोबर दुजाभाव करत असल्याचा आरोप पुणेकरांनी केला आहे. पुणे महाराष्ट्रात नसून परक्या राज्यात असल्या सारखी वागणूक देत असल्याचा घणाघाती आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपची अध्यक्ष हर्षा शहा यांनी केला आहे. तसेच पंचवटी एक्स्प्रेसप्रमाणे मुंबई-पुणे रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

पंचवटी एक्स्प्रेसप्रमाणे मुंबई-पुणे रेल्वे गाड्या सोडा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊन काळात देशभरातील रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. टाळेबंदी काही अंशी शिथिल करण्यात आल्यावर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. कारण गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई ते पुणे दरम्यान धावणार्‍या डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंद्रायणी आणि इंटरसिटी एक्स्प्रेस बंद आहे. तर मनमाड-नाशिक-मुंबई धावणारी पंचवटी एक्स्प्रेसही त्यामुळे पाच महिन्यात धावली नाही. टाळेबंदी काही अंशी शिथिल करण्यात आल्यावर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची मागणी पुणेकर आणि नाशिककरांनी केली होती. त्यानुसार नाशिककरांची मागणी मान्य केली आहे. १२ सप्टेंबरपासून पंचवटी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही ट्रेन सुरू झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुणेकरांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. कारण अनलॉकमध्ये आता १ सप्टेंबरपासून खासगी कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती १५ टक्क्यांवरून ३० टक्के झाली आहे. तर सरकारी कर्मचार्‍यांचीही उपस्थिती २० टक्यांवरून ३० टक्के करण्यात आली आहे. मात्र, मुंबई-पुणे रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे नोकरदार नोकरी टिकविण्यासाठी दुचाकी, खासगी वाहनाने मुंबई गाठत आहेत. त्यामुळे दररोज हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड पुणेकरांना बसत आहे. यापूर्वी अनेकदा मर्यादीत रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली. मात्र, राज्य सरकारकडून पुणेकरांच्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले आहे.

- Advertisement -

गाड्या नसल्याने पुणेकरांना त्रास

लॉकडाऊनपूर्वी प्रत्येक दिवशी मुंबई ते पुणे दरम्यान डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंद्रायणी आणि इंटरसिटी एक्स्प्रेस अशा चार रेल्वे गाड्या धावत होत्या. नाशिक- मुंबई दरम्यान पंचवटी एक्स्प्रेस आणि मनमाड एक्स्प्रेस अशा दोन गाड्या धावत होत्या. कामासाठी मुंबईत येणार्‍या नोकरदारांमध्ये पुणेकरांची संख्या नाशिककरांपेक्षा जास्त आहे. मात्र, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने यावर विचार न करता पुणेकरांबरोबर दुजाभाव केला आहे. राज्य सरकारने पुणेकरांची गैरसोय लक्षात घेता चार पैकी दोन तरी रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी दैनिक आपलं महानगरशी बोलताना रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी केली.


हेही वाचा – Corona in Maharashtra: राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक! आज १७,०६६ नव्या रुग्णांची नोंद

- Advertisement -

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -