घरमहाराष्ट्रगृहखात्याचा वचक नाही..., माण तालुक्यातील घटनेवरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

गृहखात्याचा वचक नाही…, माण तालुक्यातील घटनेवरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

Subscribe

मुंबई : चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून साताऱ्यामध्ये महिलेला भर चौकात बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे संतप्त झाल्या आहेत. हा व्हिडीओ अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. गृहखात्याचा वचक कुठेही दिसून येत नाही, अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – ‘हे’ सत्तापक्षाचे बेगडी हिंदुत्व, हरियाणातील घडामोडींवरून ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

- Advertisement -

गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका महिलेला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना माण तालुक्यात घडली आहे. पानवण गावातील चौघांनी या महिलेला काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा विनयभंग केला. तसेच धारदार शस्त्राने तिच्यावर वारही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून, तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

देवदास महादेव तुपे यांनी या मारहाणप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, पोलिसांनी त्वरित याची दखल घेत चारपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. देवदास रोहिदास नरळे आणि पिंटू ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे अशी या आरोपींची नावे आहेत. तर, संतोष गोपाळ नरळे आणि जनाप्पा विठ्ठल शिंदे हे गावातून पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार मुख्यमंत्री होणे अशक्य; छत्रपती संभाजीराजेंच्या दाव्यावर रोहित पवारांनी भाजपावर साधला निशाणा

या घटनेवरून सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. माण, सातारा येथे महिलेला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ पाहण्यात आला. हा व्हिडीओ अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. गृहखात्याचा वचक कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्ती निर्ढावल्या आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. महिलांना अशाप्रकारे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -