घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील चिखलमय रस्ते वाहनचालकांसाठी बनले जीवघेणे; प्रशासकीय राजवटीत अनागोंदी

शहरातील चिखलमय रस्ते वाहनचालकांसाठी बनले जीवघेणे; प्रशासकीय राजवटीत अनागोंदी

Subscribe

नाशिक : शहरातील प्रमुख महामार्गांसह अनेक भागांतील अंतर्गत रस्त्यांवर निर्माण झालेल्या चिखलामुळे अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रस्त्यांची धूळधाण, खड्डे आणि आता चिखल यामुळे नाशिककर बेजार झालेले असताना प्रशासकीय राजवटीआडून महापालिका अधिकारी मात्र कागदी घोडे नाचवत आपापल्या उद्योगांमध्ये मश्गूल आहेत.

पाईपलाईन रोड ते मोतीवाला रोड यादरम्यानचा रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यातच बांधकाम व्यावसायिकांची मोठमोठी वाहने, रस्त्याकडेचा चिखल यामुळे हा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणारे तब्बल ३० दुचाकीचालक घसरुन जखमी झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. यानंतर तिरुमला ओमकार इमारतीमधील काही जागरुक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने पाणी मारुन रस्त्यावरचा चिखल दूर केला. दुसर्‍या दिवशी परिस्थिती जैसे थे झाली. एवढे होऊनही पालिका अधिकार्‍यांना मात्र कोणतेही सोयरसूतक नव्हते. एकाही विभागाने या घटनेची दखल घेत उपाययोजना केली नाही.

- Advertisement -

दरम्यान, पाईपलाईनरोड, निर्मला कॉन्व्हेंट शाळेसमोरील रस्ता, मखमलाबाद रोड, बाजार समितीमागील रस्ता अशा ठिकठिकाणी रस्त्यांवरील चिखलामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शहरातून जाणार्‍या महामार्गांवरील खड्डे आणि चिखलामुळे दुचाकीचालकांची जीव टांगणीला लागला आहे.

गंगापूररोडवरील निर्मला कॉन्व्हेंट शाळेसमोरील रस्त्याचीही चिखलामुळे प्रचंड दूरवस्था झाली आहे. या रस्त्याकडेला शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी तसेच, पालकांची वाहने उभी राहतात. त्यातूच चिखलाची समस्या निर्माण होते. शहरातील इतर भागांतही अशीच परिस्थिती आहे. महापालिका अधिकार्‍यांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. : स्वाती भामरे, माजी नगरसेविका

अधिकार्‍यांचे हात बांधले कुणी

शहरात अनेक ठिकाणी प्रमुख रस्त्यांवर टोलेजंग इमारतींची कामे सुरू आहेत. यात मातीचे उत्खनन करताना मातीसह डेब्रिज थेट रस्त्याकडेला फेकण्याचा उद्योग काही बांधकाम व्यावसायिकांकडून सुरू आहे. अशा व्यावसायिकांवर कारवाई करताना पालिका अधिकार्‍यांचे हात कुणी बांधले, असा सवाल संतप्त नाशिककरांकडून उपस्थित होत आहे. गंगापूररोडसह मखमलाबाद, सातपूर, सिडको, नाशिकरोड भागातही अशीच परिस्थिती आहे. बांधकामासाठी साहित्य आणणारी अवजड वाहने, जेसीबीमुळे साईट्सवरचा चिखल रस्त्यावर येतो. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून डांबरीकरण केलेल्या रस्त्याची वाट लागते. असे असतानाही महापालिका अधिकारी मात्र मूग गिळून गप्प असतात. विनापरवानगी रस्ते खोदणारे, रस्त्यांवरील चिखलाला कारणीभूत बिल्डर्सवर थेट कारवाईसाठी आता पलिका आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -