घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल २६०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल २६०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

Subscribe

नाशिक : अवकाळी पावसाने उभ्या पिकांना झोडपल्याने हातातोंडाशी आलेला शेतकर्‍यांचा घास हिरावला गेल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. जिल्ह्यात ५ व ६ मार्च रोजी दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने २६८५ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांवर पाणी फेरले गेले. यात द्राक्ष, कांदा, गहू पिकांना सर्वाधिक फटका बसला.

दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यातील बागलाण, सटाणा, येवला, लासलगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर इ. तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना अवकाळीचा जोरदार फटका बसला. गव्हाबरोबरच आंबा, हरभरा, द्राक्ष या पिकांनाही अवकाळीचा फटका बसला.

- Advertisement -

या पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाऊन गळती होणार आहे. तसेच, पावसामुळे आंब्यांना आलेला मोहोर गळून पडला असून, आंबा उत्पादनावरदेखील त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा पीक तर उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. पुरणपोळी ज्या गव्हापासून तयार केली जाते त्या गव्हाचे पीक घेणारा बळीराजादेखील आज मोठ्या संकटात सापडला आहे.

नुकसानग्रस्त गावे : १९१
नुकसानग्रस्त शेतकरी : २७९८
एकूण नुकसान : २६८५ हेक्टर

पिकनिहाय नुकसान

  • कांदा : ६१.५ हेक्टर
  • गहू : १८०३.३ हेक्टर 
  • टोमॅटो : ३.५ हेक्टर 
  • भाजीपाला : ३७.५ हेक्टर 
  • द्राक्षे : ७७७ हेक्टर 
  • आंबा : २.८ हेक्टर  

जिल्ह्यात अवकाळी पावसाने कापणीला आलेला गहू, हरबरा व इतर रब्बी पिके भुईसपाट होऊन शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार दोन दिवसांत जिल्ह्यातील बाधित १९१ व संभाव्य बाधित गावांमध्ये अंदाजे २६०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे. : डॉ. भारती पवार, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -