घरमहाराष्ट्रइंदुरीकरांचा ‘तो’ सल्ला उरणच्या कीर्तनातला

इंदुरीकरांचा ‘तो’ सल्ला उरणच्या कीर्तनातला

Subscribe

पुत्रप्राप्तीचे कीर्तनातून मंत्र देणार्‍या निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांचा पाय आणखी खोलात जाऊ लागला आहे. नगरमध्ये किर्तनात मी असे काही बोललोच नाही, ही पळवाट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांनी दिलेले पुत्र प्राप्तीचे सल्ले नगरमध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य संचलनालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर माफीनामा देणार्‍या इंदुरीकरांनी आपण नगरमध्ये असे काही बोललोच नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याबाबतचे पुरावेही यूट्यूबवरून दूर करण्यात आले. इंदुरीकर यांना हायसे वाटत असतानाच त्यांच्या सल्ल्याचे नवे पुरावे हाती आले आहेत. त्यांनी ते सल्ले उरण येथे इंचगिरी संप्रदाय या वारकरी संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर दिल्याचे उघड झाले आहे.

‘नगरमधील कीर्तनामध्ये मी असे काही बोललोच नाही आणि मी असे कीर्तन केलेच नाही, असा स्वत:ला नामेनिराळे ठेवण्याचा प्रयत्न निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी गुरुवारी नव्याने केला होता. त्याआधी बुधवारी त्यांनी जाहीर पत्रकाद्वारे झालेल्या चुकीवर माफीनामा लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. कारवाईची शक्यता दिसू लागताच पळवाट शोधू पाहणार्‍या महाराजांच्या किर्तनातील नवे पुरावे पुढे आले आहेत. उरण तालुक्यातील प्रसिध्द अशा इंचगिरी संप्रदायाच्या विद्यमाने ३१ डिसेंबर ते ७ जानेवारी या दरम्यान हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्नवरीच्या वाचनाचे आयोजन कोटनाका येथील राघोबा मंदिरात करण्यात आले होते.

- Advertisement -

मंडळाकडून नामांकित अशा किर्तनकारांना या निमित्त पाचारण करण्यात आले होते. यात २ जानेवारीच्या गुरुवारी निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन होते. रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान पार पडलेल्या किर्तनावेळी अक्षरश: हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित होते. प्रचंड गर्दीमुळे इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा लाभ अनेकांना घेता येत नाही, हे लक्षात घेऊन खास स्क्रीनही लावण्यात आले होते. याच किर्तनात त्यांनी पुत्र प्राप्तीचे उपदेश दिल्याचे उघड झाले. याआधी उरणशिवाय आणखीही काही ठिकाणच्या किर्तनात त्यांनी पुत्रप्राप्तीचे सल्ले दिल्याचे यूट्यूबवरील चित्रफितीत आढळून आले आहे.

जानेवारी व फेब्रुवारीमध्ये मी नगरमध्ये कीर्तन केलेले नाही. नगरमधील कोणत्याच कीर्तनात आपण हा उल्लेख केला नसल्याचे महाराज सांगत होते. ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होते’ हे इंदुरीकरांचे वक्तव्य यूट्यूब व टिकटॉक या सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे वक्तव्य इंदुरीकर यांनी कोणत्या कीर्तनामध्ये केला, याची अधिक माहिती घेतली असता त्यांनी हा उल्लेख उरणमध्ये 2 जानेवारीला तसेच अन्य काही ठिकाणी केल्याचे युट्यूबवरील व्हिडिओतून दिसून येते.

- Advertisement -

उरण इथल्या कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराज यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणारे वक्तव्य केल्याचे उघडकीस आले आहे. मात्र हे वक्तव्य नक्की कुठल्या कीर्तनातील होते, याची माहिती मिळत नसल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न इंदुरीकर यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे स्पष्टीकरण नगर जिल्हा शल्यचिकित्सकांची दिशाभूल करणारे असल्याचे दिसून येत आहे. तसेच इंदुरीकर यांनी केलेले वक्तव्य हे उरण व अन्य ठिकाणी असल्याचे युट्यूबमधील व्हिडिओतून स्पष्ट होत असले तरी इंदुरीकर हे नगरमध्ये राहत असल्याने त्यांच्यावर नगरध्येच गुन्हा दाखल होणे सोयीस्कर ठरू शकते असेही बोलले जात आहे.

इंदुरीकर यांनी केलेले स्पष्टीकरण हे दिशाभूल करणारे असल्याने त्यांच्या स्पष्टीकरणातील तथ्य पडताळणे हे नगरच्या पीसीपीएनडीटी समिती तथा जिल्हा समुचित प्राधिकरणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. युट्यूब चॅनेलने इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ डिलीट करावेत यासाठी त्यांच्या समर्थकांकडून युट्यूब चॅनेल चालवणार्‍यांवर दबाव टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातून इंदुरीकर महाराज समाजाची व पीसीपीएनडीटी समितीची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -