Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र खरेंचे खोटे कारनामे : खरे काही लोकप्रतिनिधींचा फायनान्सर?; देव ठेवले पाण्यात

खरेंचे खोटे कारनामे : खरे काही लोकप्रतिनिधींचा फायनान्सर?; देव ठेवले पाण्यात

Subscribe

नाशिक : लाचखोर सतीश खरे याने इतकी संपत्ती गोळा केली आहे की, तो निवडणुकीच्या वेळी काही लोकप्रतिनिधींचा ‘फायनान्सर’ बनत असल्याची चर्चा आहे. खरेने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे आपले नाव सांगू नये म्हणून संबंधित लोकप्रतिनिधी ‘देव पाण्यात बुडवून’ असल्याचे कळते.

सतीश खरेची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी केली असता त्याचे बँकेत तब्बल १३ खाते आढळून आले. त्याचप्रमाणे त्याच्या घरझडतीत १५ लाख ८६ हजार रोख रक्कम आणि ५६ तोळे सोनेही आढळून आले होते. लॉकरमध्ये लाखो रुपये असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा कॉलेजरोड परिसरात अलिशान थ्री बीएचके फ्लॅट असून दोन लक्झरी कार आहेत. ‘आपलं महानगर’ला मिळालेल्या माहितीनुसार खरेने चांदवड तालुक्यातील शेलू या गावात नुकतीच २५ एकर जमीन तर, सटाणा तालुक्यातील करे या गावात १८ एकर जमीन नातेवाईकाच्या नावाने घेतल्याचे समजते.

- Advertisement -

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या माहितीची शहनिशा करत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी बँका, पतसंस्था आदींच्या निवडणुका आणि विविध दाव्यांतून खरेने आपली तुंबडी भरल्याची चर्चा आहे. यातून त्याने कोट्यवधींची ‘माया’ जमवल्याचे बोलले जाते. मिळालेले पैसे कोठे ठेवायचे असा प्रश्न खरेला पडायचा, असे त्याचे पूर्वीचे सहकारी सांगतात. यातील काही पैसे तो निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींना वापरायला देत असल्याचे बोलले जाते. यातून संबंधित लोकप्रतिनिधीशी घनिष्ठ संबंध होऊन त्याचा वापर तो त्याचे स्थान बळकट करण्यासाठी करीत होता. ज्या लोकप्रतिनिधींना त्याने पैसे दिल्याचा संशय आहे, ते लोकप्रतिनिधी खरेने तोंड गप्प ठेवावे म्हणून ‘देव पाण्यात बुडवून’ बसल्याचे कळते. खरेने जर त्यांच्या नावाची वाच्यता केली, तर त्यांचीही चौकशी लागण्याची शक्यता आहे.

लाचलूचपतच्या अहवालानंतर निलंबनाचा प्रस्ताव

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खरे यांच्यावरील कारवाईचा अहवाल विभागीय सहनिंबधक कार्यालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागाकडून राज्य शासनाकडे सादर होईल. तत्पूर्वी विभागीय सहनिंबधक विभागाने खरे यांच्याबाबतचा तोंडी अहवाल सहकार विभागास कळविला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -