चुंबन घेणे अनैसर्गिक लैंगिक संबंध नाही

आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

types of kisses

भारतीय दंड संहितेच्या कलम 377 नुसार ओठांवर चुंबन घेणे आणि प्रेम करणे हा अनैसर्गिक लैंगिक संबंधातील गुन्हा नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका आरोपीला जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे भादंवि कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला जामीन मिळणे कठीण असते. या कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. असे असले तरी या प्रकरणात न्यायमूर्तींनी आरोपीला ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

एका दुकानदाराने 14 वर्षीय मुलाच्या ओठांचे चुंबन घेऊन त्याच्या गुप्तांगांना स्पर्श केल्याप्रकरणी गेल्या वर्षी पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर पोस्को कायदा आणि कलम 377 नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, आरोपीने फिर्यादीच्या खासगी भागाला स्पर्श करीत चुंबन घेतल्याचे फिर्यादीचा जबाब आणि एफआयआर सूचित करीत आहे, मात्र माझ्या मते हे भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ अंतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा ठरणार नाही. गुन्हा दाखल केल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत मुलावर झालेल्या लैंगिक आत्याचाराची पुष्टी झाली नाही. त्यामुळे एका वर्षानंतर आरोपीला जामीन मिळण्याचा हक्क आहे, असे नमूद करीत न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर केला.