घरदेश-विदेशएका कुटुंबात एकच तिकीट काँग्रेसच्या चिंतन शिबिरात निर्णय

एका कुटुंबात एकच तिकीट काँग्रेसच्या चिंतन शिबिरात निर्णय

Subscribe

निवडणुकीतील सततच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसने चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय चिंतन शिबिरात काँग्रेसच्या सर्वच बड्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. चिंतन शिबिराच्या अखेरच्या दिवशी रविवारी एका कुटुंबात निवडणुकीचे एकच तिकीट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला आहे. दुसर्‍या सदस्याला तिकीट हवे असल्यास त्याने पक्षासाठी निदान पाच वर्षे सक्रियपणे काम केले असेल तरच त्या व्यक्तीला तिकीट मिळेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका कुटुंबात एकच तिकीट देण्यावर काँग्रेसमधील बहुतेक सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे एकमत झाले असून त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. सोबतच काँग्रेस संघटनेत एकाच पदावर पाच वर्षांची एक टर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा लगेच संधी मिळणार नाही. तीन वर्षांचा कुलिंग ऑफ कालावधी असेल आणि त्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती करता येईल. संघटनेतील 50 टक्के पदे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिली जातील.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडी समिती स्थापन केली जाईल, ज्याचे सदस्य काँग्रेस वर्किंग कमिटीमधून घेतले जातील. ही समिती संसदीय मंडळाप्रमाणे काम करेल, ज्याची मागणी जी 23 नेत्यांनी केली होती. म्हणजे महत्त्वाच्या राजकीय मुद्यांवर अध्यक्ष या समितीचे मत घेतील. संघटना, ओबीसी/एससी/एसटी महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले जाईल, असेही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

खुल्या चर्चेला वाव – राहुल गांधी
काँग्रेसच्या चिंतन शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इतर नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशात असा कुठला दुसरा पक्ष आहे ज्यामध्ये खुली चर्चा आणि संवाद होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप अशा प्रकारच्या संवादाला कधीच संधी देणार नाही. जनतेसोबत चर्चा की जनतेसोबत हिंसा? यामध्ये निवडण्याची वेळ आली आहे. देशातील संस्थांचा पद्धतशीरपणे नाश केला जात असल्याचे आपण संसदेमध्ये बघत आहोत. न्यायपालिका दबावात आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -