पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; सुरळीत वाहतुकीसाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर

पाऊस आणि वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी अद्ययावत यंत्रणाही उभारण्यात आल्या असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा कितीही पाऊस असला तरीही कोकण रेल्वे ठप्प होण्याचे प्रमाण कमी होईल असं म्हटलं जात आहे.

कोकण रेल्वे (Kokan Railway) मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम होऊ नये याकरता कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. पावसाळ्यात रेल्वेचा (Railway) वेग मंदावणार असून वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. तसेच, पाऊस आणि वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी अद्ययावत यंत्रणाही उभारण्यात आल्या असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा कितीही पाऊस असला तरीही कोकण रेल्वे ठप्प होण्याचे प्रमाण कमी होईल असं म्हटलं जात आहे.

दऱ्या-खोऱ्यातून कोकण रेल्वेचा मार्ग जातो. त्यामुळे अनेकदा मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. मात्र, यावेळेस कोकण रेल्वे पावसळ्यातही सुरळीत राहावी याकरता कोकण रेल्वेकडून चोवीस तास गस्तीसाठी ८४६ जणांची नियुक्ती केली आहे. तसेच, रेल्वे रुळांच्या शेजारी असणारी गटारे, रुळांची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्याचे आदेशही कोकण रेल्वेकडून देण्यात आले आहेत.

वेग मंदावणार

पावसाळ्यात दृश्यमानता (Visibility) कमी होते. त्यामुळे ज्या भागात दृश्यमानता कमी असेल अशा ठिकाणी ४० किमी प्रति तास इतक्या वेगाने रेल्वे चालवण्याच्या सूचना लोको पायलट (Loco Pilot) यांना देण्यात आल्या आहेत.

अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन

पावसाळ्यात अनेकदा अपघाताची शक्यता असते. मात्र, अशावेळी तत्काळ मदत मिळावी याकरता वर्णा येथे अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन (Accident Relief Train) सज्ज ठेवण्यात आली आहे. तर, वैद्यकीय मदतीसाठी सेल्फ प्रोपल्ड एमआरव्हिसी (Self Propelled MRVC) रत्नागिरी येथे अद्ययावत करण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक स्थानकावर वायरलेस संपर्काची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रत्येक एक किमी अंतरावर इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेटस असणार आहेत.

वेळापत्रकात होणार बदल

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात (Kokan Railway Timetable) बदल होणार आहे. येत्या १० जूनपासून नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे धावणार आहेत.

पाऊस-वाऱ्याचा अंदाज येणार

कोकणात प्रचंड पाऊस असतो. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गांवरील माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उड्डपी सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक (self recording rain gauge) बसवण्यात आले आहेत. तर, रत्नागिरी-निवसर स्थानकांदरम्यान पानवल पुलावर, मांडवी पूल, झुआरी ब्रिज आणि शरावती ब्रिज या ठिकाणी वाऱ्याचा वेग नोंदवणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे.