कोकणातील जमिनी फसवणूक करत दलालांच्यामार्फत खरेदी, खासदार विनायक राऊतांचा खळबळजनक दावा

कोकणातील सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या २० गावांच्या जमिनी या दलांलामार्फत फसवणूक करत खरेदी-विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. विनायक राऊत यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Lands in Konkan fraudulently purchased through brokers, sensational claim of MP Vinayak Raut

कोकणात प्रशासनातील माणसांना हाताशी धरून अवैधपणे जमिनींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. दादर येथील शिवसेना भवनात विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यामध्ये ते बोलत होते. कोकणातीव तब्बल पाच हजार एकर जमीन दलालांच्यामार्फत फसवणुकीने खरेदी करण्यात आल्याची माहिती विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, कोकणात शेतकऱ्यांना लुबाडून दलालांच्यामार्फत शेत जमिनी खरेदी करण्यात येत आहे. या जमिनींच्या व्यवहारामध्ये जमिनींचे दलाल, कंपन्यांचे दलाल, प्रशासक व्यवस्था या सगळ्यांना हाताशी धरून या जमिनी खरेदी केल्या जात आहेत. एकट्या संगमेश्वर तालुक्यात कुचांबे ते ओझरे या सह्याद्रीच्या घाटपट्ट्यातील जवळपास २० गावातील किमान पाच हजार एकर जमिन ही मागच्या काही वर्षात पुर्णपणे तिथल्या ग्रामस्थांना अंधारात ठेऊन आणि खऱ्या जमीन मालकांना कोणतीही कल्पना न देता त्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले आहेत.

तसेच, याबाबतची माहिती कोणालाही न देता वनखात्याची जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले आहेत. तर संगमेश्वरमधील निगुडवाडी आणि कुंडी गाव या दोन्ही गावातील १२३.४६ हेक्टर जमीन केवळ आठ दिवसांत खरेदी करण्यात आली आहे. या जमिनी ज्यांच्या नावावर आहेत, त्यांतील काही मयत आहेत आणि या मयत लोकांच्या जागी बोगस माणसे उभी करून त्यांच्या नावे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात आले आहेत. तर रजिस्ट्रेशन विभागाने सुद्धा याबाबतची कोणतीही चौकशी न करता दलालांच्या आमिषाला बळी पडून या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला अधिकृतरित्या मान्यता दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत या अवैध खरेदी-विक्रीच्या प्रकरणातील २० गावांबाबतची माहिती देखील सर्वांसमोर आणणार असल्याची माहिती यावेळी खासदार विनायक राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणांमध्ये अनेक मागासवर्गीयांच्या जमिनी असून त्यांचा व्यवहार देखील अशाच पद्धतीने करण्यात आल्याचे यावेळी राऊतांनी सांगितले.


हेही वाचा – …तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील, राहुल गांधींच्या शिक्षेवरून काँग्रेसची प्रतिक्रिया