पुण्यातील शाळा, महाविद्यालय २८ फेब्रुवारीपर्यंत बंद, रात्रीची संचारबंदी लागू

पुण्यात पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन.

pune municipal corporation new ४२ micro containment zone in pune
पुण्यात ४२ ठिकाणी पुन्हा निर्बंध जाहीर

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख खाली गेला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हा आलेख वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्या सुरुवातीच्या काळात ४ टक्के होती. आता १० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली असून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

काय आहेत पुण्यातील निर्बंध?

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यापार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत. पुण्यात रात्री ११नंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासिका वर्ग ५० टक्के क्षमतेने चालविण्यात यावेत. त्याचप्रमाणे रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल्सही ११ पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तसेच लग्न समारंभासह राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी अगोदर पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच याकरात २०० नागरिकांचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र, याकाळात अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माहिती दिली आहे.

पुढील १५ दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून अलीकडच्या काही दिवसांपासून राज्याच्या कोरोना रुग्ण संख्येत सुमारे २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे असतील, असा इशारा आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे. प्रशासनाने कोरोना परतल्याचे गांभीर्य ओळखून नागरिकांवर निर्बंध आणण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात ३१ हजार ४७९ इतके कोरोना रुग्ण होते. हा आकडा वाढून आता ४५ हजारच्या घरात पोहचला आहे. यामुळे राज्याची चिंता वाढलीय. एकट्या मुंबईतच कोरोना रुग्ण वाढीमध्ये तब्बल ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.


हेही वाचा – Live Update: विदर्भातील ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू